बारामती प्रतिनिधी
कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या वतीने दि.५ व ६ सप्टेबर २०२० रोजी गौरी सजावट आणि गणपती सजावट ऑनलाईन प्रदर्शनाचे आयोजन पारंपरिक सण-उत्सव यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले.
या अंतर्गत कलाप्रेमी यांना सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी दि.२२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२० असा एकूण ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.या कालावधी मध्ये कलाप्रेमी यांनी स्वतःच्या घरामध्ये अतिशय सुंदर,मनमोहक,
विलोभनीय,आकर्षक,गणपती सजावट व गौरी सजावट यांची निर्मिती करून त्या ऑनलाईन सादर केल्या.सदर प्रदर्शनामध्ये मध्ये सात दिवसात अभूतपूर्व व उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांच्या विविध भागातून एकूण "६००" कलप्रेमींनी ऑनलाईन सहभाग घेतला
सहभागी कलाप्रेमी यांच्या गणपती सजावट व गौरी सजावट याचे ऑनलाईन प्रदर्शन अनुक्रमे दि.४ व ५ सप्टेबर २०२० या दिवशी फेसबुक,व्हाट्सएप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले.
सहभागी कलाप्रेमी यांची स्वतंत्र यादी व्हाट्सएप ग्रुप व फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध करून सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच सदर प्रदर्शनातील सर्व सहभागी कलप्रेमींना आकर्षक ऑनलाइन डिजिटल सहभाग प्रमाणपत्र ट्रस्टच्या वतीने देण्यात आले.
सदर उपक्रमाचे समाजात प्रथमच आयोजन करण्यात आले असून याचे संपूर्ण नियोजन कुलवंत वाणी समाजातील सर्व समन्वयक यांनी केले होते.या उपक्रमात बहुसंख्य समाजबांधव व भगिनी यांनी सहभाग नोंदवला.या उपक्रमाचे आयोजन गणपती व गौरी या उत्सवाच्या कालावधीत केल्यामुळे सर्व समाजबांधव महिलांचा आनंद द्विगुणित झाला.यामुळे उपक्रमाबाबत समाजात सर्वत्र स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे.
अशी माहिती कुलवंत वाणी समाज ट्रस्टचे समन्वयक श्री.अशोक बसाळे,श्री.मुकुंद भसाळे व श्री.प्रियेश तोडकर यांनी बोलताना दिली.



