बारामती प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाने केलेल्या विशेष कामगीरी बाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याकडून प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. बारामती येथे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने छडा लाऊन भर पावसात सोमवारी (दि. २१) मध्यरात्री ३ वाजता कारवाई करीत ३१२ किलोगांजासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी चौघांना अटक करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजय जालिंदर कणसे (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली), विशाल मनोहर राठोड (वय १९, रा. नागेवाडी, बिटा, ता. खानापूर, जि. सांगली), नीलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सुफळ, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार एक ट्रक गांजा घेऊन येणार असल्याची माहिती योगेश लंगुटे यांना मिळाली होती त्यानुसार पाटस आणि भिगवण मार्गावर नाकाबंदी करत दोन पोलीस पथकांद्वारे वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली होती. याचवेळी मध्यरात्री ३ च्या सुमारास उंडवडी येथे पाटसवरुन बारामतीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यानंतर देखील चालकाने टेम्पो न थांबवता वेगात पुढे नेला. या वेळी पोलिसांनी सरकारी वाहनासह खासगी मोटारीतून टेम्पोचा पाठलाग करत टेम्पो अडवला होता. पोलिसांनी या टेम्पोची तपासणी केली असता त्यात ११ पोती आढळली होती. त्याची तपासणी केली असता, त्यात खाकी रंगाच्या प्लॅस्टिक बँगांमध्ये गांजा आढळला. जवळपास ४६ लाख रूपये किंमत असलेल्या ३१२ किलो गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो असा ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधवय आणि मनोवयापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम २० (बी) २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेशोध पथकाचे प्रमुख योगेश लंगुटे व त्यांच्या पथकातील पोलीस सहकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी प्रशंसा क़रत रोख १० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. बारामती गुन्हे शोध पथकाने पोलीसांना गुंगारा देत पळ काढणाऱ्या आजतागायत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळून जेरबंद केले आहे. याबाबत बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी योगेश लंगुटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे, पोलीस हवालदार अनिल ओमासे, भानुदास बंडगर, दत्तात्रय सोननीस, पोलीस नाईक अनिल खेडकर, परिमल मानेर, रणजित मुळीक, संतोष मखरे, राजेंद्र काळे, प्रशांत राऊत, अमोल नरुटे, दत्तात्रय मदने, नंदू जाधव, विनोद लोखंडे, भुलेश्वर मरळे, पोपट कवितके, मंगेश कांबळे, योगेश चितारे, चालक अबरार शेख तसेच या कामगीरीत सहभागी असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.