खरतर राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी दिवाळी पूर्वी झाली होती. मात्र, दिवाळीमध्ये बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागले आहेत. त्यामुळे करोनाची दुसरी लाट आली तर “ती जनतेनेच ओढवून घेतली’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. “करोनाची दुसरी लाट घेऊन येणे किंवा “तिला थोपवणे’ हे जनतेच्याच हाती आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
करोनाविषयक सुरक्षेच्या सूचना डावलल्याचे परिणाम युरोपमधील अनेक देश भोगत आहेत. त्यांना दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करावे लागले. अशीच काहीशी परिस्थिती दिल्लीत उद्भवली असून दिल्लीत करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात पहिली लाट ऑक्टोबरमध्ये ओसरण्यास सुरवात झाली. मात्र, त्याचवेळी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी याआधीच वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी यंदाचा दिवाळी सण सोशल डिस्टन्सिंगने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संपूर्ण आरोग्य यंत्रणा वारंवार करत होती.मात्र, शहर किंवा ग्रामीण भागात कोठेही या नियमांचे पालन होताना दिसले नाही. उलट गर्दीच्या ठिकाणी उभे राहून नागरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. तर काही नागरिकांन तोंडाला मास्क न लावता फिरत होते. काही राजकीय पक्षांना मंदिर उघडण्याची व तेथे ढोल बडविण्याची घाई झाली होती. आता मंदिरे उघडल्यानंतर त्याठिकाणी दर्शनासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यातील सारस बाग आणि मंदिर बंद ठेवावे लागले.