लोणीभापकर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री नायकोबा देवाची यात्रा कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्या वतीने सर्व भाविकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, दि. १५ व १६ डिसेंबर २०२० रोजी होणारी यावर्षीची श्री नायकोबा देवस्थान यात्रा व पालखी सोहळा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमुळे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नायकोबा मंदिर परिसरात भाविकांनी यात्रेच्या दरम्यान गर्दी करू नये असे आवाहन नायकोबा देवस्थान यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून राज्याच्या विविध भागातून भाविक दरवर्षी याठिकाणी येत असतात. मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेत बकरी कातरण्याच्या कात्री, लोकरीपासून बनविलेली ऊबदार घोंगडी, जान, ब्लॅंकेट, घरगुती वस्तू तसेच धनगर समाजासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य अशा माध्यमातून याठिकाणी ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची खरेदी विक्रीची उलाढाल येथे होत असते.
यात्रेदरम्यान गुलालाची उधळण करीत देवाचा छबिना, ढोल ताश्यांच्या गजरात पारंपरिक ढोल लेझीम व गजीनृत्याचा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो. तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या जंगी मैदानाचा भव्य कार्यक्रम असतो. पण यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यात यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य, संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.