वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
घरच्यांनी नवीन मोबाईल घेऊन दिला नसल्याच्या नैराश्यातून इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी छताच्या एँगलवर साडी बांधून गळफास घेतला असल्याची धक्कादायक घटना वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील सिद्धार्थ नगरमध्ये उघडकीस आली आहे .
आदित्य रविंद्र दोडके ( वय १५ )असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत वाल्हे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास रविंद्र दोडके ( रा.वाल्हे, सिद्धार्थ नगर ) हे गावातील कृष्णा आनंदी अपार्टमेंट मध्ये पेंटींगचे काम करत असताना त्यांचाच लहान मुलगा राहुल दोडके ( वय १३ ) त्यांच्याकडे येऊन म्हणाला आदित्य याने घरात गळफास घेतला आहे.
या दरम्यान रविंद्र दोडके हे लागलीच घरी आल्यानंतर त्यांनी निलेश आबुराव भोसले व निलेश सुधाकर पवार यांच्या मदतीने घरात प्रवेश केला.त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा आदित्य दोडके हा किचन रूम मधील पत्र्याच्या छतास असणाऱ्या लोखंडी एँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला .
या घटनेची खबर रविंद्र शंकर दोडके ( वय ४० ) यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी आदित्य दोडके याचा मृतदेह जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष मदने हे करित आहेत.