लोणंद प्रतिनिधी
लोणंद येथील दोन प्रथितयश इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना फी साठी त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. यापैकी एका शाळेतील विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणावरून परीक्षेला बसू दिलं नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
लोणंद येथील सेंट ॲन्स या नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना फी न भरण्याच्या कारणावरून परीक्षेला बसू दिलं नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबत अनेक पालकांनी खंडाळा येथील गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव यांना लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या शाळेतील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलून घेण्यात आली. यावेळी फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना एका वेगळ्या खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच कोरोना काळात फी सवलत द्यावी ही मागणी देखील शाळेकडून धुडकाऊन लावण्यात आली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे . या विषयावर लोणंद येथील केंद्र प्रमुख डि बी धायगुडे यांनी शाळेत चाललेला हा गैरप्रकार चालवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. याविषयी शाळेचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शाळेच्या वतीने काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
या गैरप्रकाराची लेखी स्वरुपात तक्रार गटशिक्षणाधिकारी यांना खंडाळा येथे जाऊन देण्यात आली आहे. यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक खंडाळा येथे उपस्थित होते. तसेच यावेळी ज्या पालकांनी शाळेची फी अद्याप पूर्ण भरली नाही त्यांनी फी भरण्याची घाई न करता याविषयी शासनाच्या आदेशाची वाट पहावी असे आवाहन उपस्थित पालकांनी केले आहे.