पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन 2021 शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
पुणे,
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन 2021 मध्ये डाळिंब व सिताफळ या दोन फळ पिकासाठी जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार तसेच नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्सास शेतकऱ्यांना विमा सरंक्षण देणे व नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बाधित राखणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे, या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. ऐच्छिक कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल.
आवश्यक कागदपत्र-विहीत नमुन्यातील प्रस्ताव पत्रक पुर्णतः भरुन फळबागेची नींद असलेला ७/१२ उतारा फळपिकाची बाग उत्पादनक्षम असलेबाबत स्वयंघोषणापत्र फळ बागेचा Geo Tagging केलेला फोटो व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बैंक शाखेत वि.का.स सेवा सोसायटीत अथवा सीएससी केंद्रात अंतिम मुदती पूर्वी जमा करावी. सदरची योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महवेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्ताक्षेप राहणार नाही.
खेड, दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, पुरंदर, शिरुर व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी डाळिंब पीकांसाठी अंतिम मुदत १४ जुलै २०२१ असून भरावयाचा हप्त्याची रक्कम 6 हजार 500 रुपये आहे. तसेच विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रुपये आहे. डाळिंब पिकांसाठी विमा संरक्षण कालावधी 15 जुलै ते 15 ऑक्टोबर (पावसाचा खंड) 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर (जास्त पाऊस) असा आहे. आंबेगाव, इंदापुर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर, शिरुर तालुक्यातील सिताफळ पीकांसाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२१ असून भरावयाचा हप्त्याची रक्कम 6 हजार 325 रुपये आहे. तसेच विमा संरक्षित रक्कम 55 हजार रुपये आहे. सीताफळ पिकांसाठी विमा संरक्षण कालावधी 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर (पावसाचा खंड) 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर (जास्त पाऊस) असा आहे असा आहे.
शेतकऱ्यांना माहिती महसूल मंडळाची यादी व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना नजीकच्या बँक शाखेत, सहकारी पतपुरवठा संस्था यांचेकडे उपलब्ध आहेत. अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे यांचे मार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शेतक-यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय, नजीकच्या बँक शाखेत, सहकारी पतपुरवठा संस्था व नजिकच्या सीएससी सेंटर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
कार्यान्वित कंपनी नाव व पत्ता....
भारतीय कृषी विमा कंपनी, स्टॉक एक्सजेंज टावर्स, 20 वा मळा, दलाल स्ट्रीट मुंबई
टोल फ्री क्रमांक -18004195004
दूरध्वनी क्रमांक – 022-61710912
ईमेल- आयडी- pikvima@aicofindia.com