'लोककल्याणकारी राजा' राजर्षी शाहू
महाराष्ट्र राज्याला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. त्यापैकीच एक द्रष्टा राजा व समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कालगचे जाहंगीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील व राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षाचे असतांना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी मार्च 1884 मध्ये त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज झाले. महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. इ. स. 1885 मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल 1891 रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला.
ब्रिटिश राजवटीत सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू राजांनी प्रयत्न केले व सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
शाहू महाराजांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. 1896 चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांनी कशोसीने प्रयत्न केले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने सुरू केली व निराधारासाठी आश्रमाची स्थापना केली. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले. स्वातंत्र्यापूर्वी काही वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.
शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये त्यांनी शाळा काढल्या. अस्पृश्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी शाहू महाराजांनी त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी केली. तत्कालीन संस्थानातील शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी काढला.. देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ची स्थापना केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. शाहूंनी अनेक जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला त्यांनी प्रत्यक्ष सहकार्य केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यामुळेच त्यांचा संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. त्यांच्या मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव होय. ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखून बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले. इ. स.1901 मध्ये त्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ ची स्थापना केली. तसेच जैन, लिंगायत व मुस्लिम अशा विविध जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र्य वस्तीगृहे शाहु महाराजांनी स्थापन केली. 03 मे 1888 रोजी “कोल्हापूर ते मिरज” या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली. अशा प्रकारे समाजात असलेली दुरी नष्ट करण्यासाठी व समाज प्रगत व्हावा यासाठी त्यांनी सर्वोतपरी कार्य केले.
02 जुन 1902 रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या 07 व्या एडवर्ड च्या राज्यरोहन संमारंभासाठी इंग्लंडला गेले असता त्यांच्या या उत्तुंग कार्याची दखल घेवून केंब्रिज विद्यापीठाने महाराजांना ‘एलएलडी’ ही पदवी बहाल केली.
राजर्षी शाहू महाराजांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत यथार्थपणे गौरविलेले आहे. अशा या लोककल्याणकरी द्रष्ट्या राजास त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन.