मौजे मेखळी येथे कृषि संजीवनी मोहिम कार्यक्रम संपन्न
बारामती प्रतिनिधी
कृषि संजीवनी मोहिम कार्यक्रम मौजे मेखळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात गावचे सरपंच रणजित बापुराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी शास्त्रज्ञ ,कृषि विज्ञान केंद्र बारामती संतोष करंजे, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि सहायक बाजीराव कोळेकर, सचिन खोमणे, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवकाते, युवराज देवकाते, बाळूबाई चोपडे, बाळासाहेब देवकाते, सुनिल कोळेकर, तात्याबा इंगळे, संचालक, माळेगांव कारखाना विलास देवकाते, ग्रामसेवक सुजाता आगवणे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शास्त्रज्ञ करंजे यांनी एक गाव एक वाण अंतर्गत कापूस पिकाबाबत लागवड तंत्रज्ञान, खतांचा संतुलित वापर, एकात्मिक किड व्यवस्थापन, कापूस वेचणी व विक्री, गावाचा विचार करता चोपण जमिन सुधारणा बाबत सखोल मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कापूस लागवड करण्याचे आवाहन करून त्यासाठी कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र आपणांस मार्गदर्शन करण्यास सदैव तयार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि पर्यवेक्षक नेमाजी गोलांडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन कृषि सहायक सागर चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन विकास कारंडे यांनी केले.