चाकण येथील वीरशैव लिंगायत समाज्याच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
चाकण (ता. खेड ) येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रांतिक सदस्य पत्रकार किरण खुडे आणि पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र होडगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या कार्यक्रमासाठी चाकण शहराध्यक्ष चंद्रकांत हलगे, उपाध्यक्ष शिवाजी उगाणे, बांधकाम विभागाचे संतोष पवार, किशोर बोराटे, अशोक भाले, संजय शेटे, मारुती नागसाखरे, विजय कंटीकर, महेंद्र हलगे, सुवर्णा शेटे, सचिन कंटीकर, चंद्रकांत स्वामी, चंद्रकांत खुडे, नंदकुमार शेटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चाकण शहराध्यक्ष चंद्रकांत हलगे म्हणाले, “चाकण येथे वीरशैव लिंगायत समाजाची सुमारे सहाशे कुटुंब वास्तव्यास आहेत. लिंगायत समाजात परंपरेनुसार अंत्यविधी हा समाधी (दफनविधी) पद्धतीने केला जातो. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शासनाकडे जागेची मागणी केली होती, त्यानुसार राक्षेवाडी (चाकण) येथे वीस गुंठे जागा शासनाने स्मशानभूमीसाठी मंजूर केली होती. समाजातील दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणी जमा करून या जागेचे सपाटीकरण केले आहे. परंतु, संरक्षकभिंत, निवाराशेड, पाण्याची टाकी, प्रवेशद्वार अशा गोष्टींची आवश्यकता असल्याने आम्ही याविषयी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन मागणी केली. आमच्या या मागणीला प्रतिसाद देत डॉ. कोल्हे यांनी संरक्षक भिंतीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या कामी पाठपुरावा करण्यासाठी खुडे आणि होडगे यांचे अनमोल सहकार्य लाभले, त्यामुळे काम आज आकारास येत आहे.” असेही ते म्हणाले.
याप्रसंगी किरण खुडे, रवींद्र होडगे यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. तर मारुती नागसाखरे यांनी आभार मानले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गर्दी न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करावा, अशी सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून व मास्क लावून हा कार्यक्रम करण्यात आला, असे चाकण लिंगायत समाजाचे सचिव अशोक भाले यांनी सांगितले.