Type Here to Get Search Results !

कोविड लसीकरणाला गती देण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ अभियान

कोविड लसीकरणाला गती देण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ अभियान
पुणे, जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरणाला गती देण्यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत 'मिशन कवच कुंडल अभियान' राबविण्यात येणार असून दसऱ्यापर्यंत ग्रामीण व शहरी क्षेत्रात १०० टक्के पात्र नागरिकांना लशीच्या किमान एक मात्रेच्या माध्यमातून कोविड विरोधात लढण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी अभियान कालावधीत विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

      अभियानांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना लसीची १०० टक्के पहिली मात्रा व ७५ टक्के दुसरी मात्रा देण्यासाठी गावनिहाय पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य, महसूल, ग्राम विकास, महिला व बाल विकास व  शिक्षण या विभागांचा सहभाग असणार आहे.  लसीकरणासाठी आरोग्य विभागाची पथके कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी इतर विभागांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

        पुणे जिल्ह्यात ६ ऑक्टोबर २०२१ अखेर १ कोटी ९ लाख २३ हजार १३ लसीकरण पूर्ण झाले असून त्यापैकी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात ४७ लाख ३ हजार १५४, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात २० लाख ५७ हजार २०, पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात ४१ लाख ६२ हजार ८३९ लसीकरण पूर्ण झाले आहेत. या लसीकरणापैकी ७३ लाख १७ हजार ४३८ नागरिकांना पहिली मात्रा (८८ टक्के) तर ३६ लाख ५ हजार ५७५ नागरिकांना दुसरी मात्रा (४९ टक्के) देण्यात आले आहे.    

      'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी' वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात ३० सप्टेंबर २०२१ ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह, भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह आणि पिंपळे गुरव येथील निळू फुले सभागृहात सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबवून १६ हजार ८१८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.  

       पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कमला नेहरु रुग्णालय व सुतार रुग्णालय याठिकाणी सलग ७५ तास लसीकरण मोहीम ५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू आहे, तर पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्त्री रुग्णालय बारामती, उपजिल्हा रुग्णालय दौंड, ग्रामीण रुग्णालय चाकण, प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, खडकवासला, लोणीकाळभोर व उपकेंद्र हिंजवडी या सात ठिकाणी ११ ऑक्टोबर २०२१ पासून सलग ७५ तास लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test