बारामती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात चिखलाचे साम्राज्य
बारामती प्रतिनिधी-बसस्थानकाच्या नवीन बांधकामामुळे बारामती येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या बसस्थानकात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बसस्थानकात पाणी साचले असून प्रवेशद्वारातच सगळीकडे चिखलमय झाल्याने प्रवाशांना चिखलातून ये- जा करावी लागत आहे. यामुळे प्रवाशांसह चालक वाहक यांना देखील समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दररोज बारामती बस स्थानकात महाराष्ट्रासह परराज्यातून हजारो प्रवाशी ये-जा करत असतात.तसेच बसस्थानकात येणारे वृध्द व लहान मुले चिखलात घसरून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बारामती बसस्थानकाची स्थिती दयनीय झाली होती. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून जुन्या बसस्थानकाच्या जागेवर तब्बल ५० कोटी रुपयांचे नवीन सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेले बसस्थानक उभारण्यात येत आहे. राज्यातील सर्वाधिक सुंदर व प्रशस्त बसस्थानक बारामतीत होणार असल्याने याची उत्स्तूकता संपूर्ण बारामती तालुक्याला लागून आहे.
मात्र, प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरुपात जुन्या पत्राच्या शेडमध्ये बसस्थानक उभे आहे. बुधवारी झालेल्या
पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मात्र, पाऊस पडल्या नंतर दररोज हीच स्थिती निर्माण होत आहे. बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे चालकाला बस स्थानकाच्या बाहेर काढताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परंतु चिखल व साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेले डबके याचा प्रवाशांसह वाहक चालक यांना होणारा त्रास आगारप्रमुखांना दिसत असून देखील अद्यापपर्यंत याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बारामतीच्या आगरातील अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होऊ लागली आहे.