Type Here to Get Search Results !

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 7200 रूपयांपर्यंत वाढ -मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 7200 रूपयांपर्यंत वाढ -मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा
-●*एसटीच्या इतिहासातील सर्वाधिक वेतनवाढ*
-● *दरमहा वेतनाची हमी राज्य शासन घेणार*
-● *कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन* 
मुंबई -  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी  मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक,  वाहक,  यांत्रिकी कर्मचारी  व लिपिकांच्या मूळ पगारात सुमारे 7200 रुपयांपासून 3600  रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री, अॅड. परब यांनी आज झालेल्या पत्रकार परीषदेत केली.
 एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे. तसेच यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यत होण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगतानाच कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीने कामावर रूजू होण्याचे आवाहनही श्री. परब यांनी यावेळी केले.
श्री. परब म्हणाले,एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे  ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.  प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी कामावर रूजू होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कामगारांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, तसेच संपकाळात निलंबित व सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या  कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामावर रूजू व्हावे. कामावर रूजू होताच त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री. परब यांनी  जाहीर केले. तसेच नव्याने झालेली वेतनवाढ नोव्हेंबरच्या पगारापासून देण्यात येईल, वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन देणार असून पगार वेळेत देण्याची हमीही राज्य शासनाने घेतली आहे.असेही मंत्री, अॅड.  परब यांनी यावेळी  स्पष्ट केले.  
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री अतिथिगृह येथे कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरु होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.  मा.न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळास समोर ठेवला होता तसेच शिष्टमंडळाने याबाबत पर्याय द्यावे असे  आवाहन केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीला एसटी कामगारांबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते. त्यानंतर आज  सायंकाळी झालेल्या  पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री श्री. परब यांनी  कामगारांच्या वेतनवाढीची घोषणा केली.  
दरम्यान, कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार श्री. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचे श्री. परब यांनी सांगितले.
  कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीसंदर्भात माननीय न्यायालयाने  समिती नेमली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत दिली आहे. परंतु, समितीला दिलेल्या मुदतीच्या दरम्यान ग्रामीण भागातील जनता, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे नुकसान होऊ नये, म्हणून ही वेतनवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. समितीचा अहवाल जो येईल त्यावर शासन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.  संपाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. कामगारांनी ही एक पाऊल पुढे टाकून संप मागे घ्यावा, असे आवाहनही परिवहनमंत्री श्री. परब यांनी यावेळी  केले. 
दरम्यान एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांचा मोठा हातभार असतो. यापूढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी  चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. कामगारांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन ही श्री. परब यांनी यावेळे केले. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबियांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test