श्री सोमेश्वर साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ;कामगारांनी फटाके वाजवून केले स्वागत.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कामगारांना नोव्हेंबर २०२१ च्या पगारात १२ टक्के वेतनवाढ लागू करण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप
यांनी केली. यामध्ये कायम, हंगामी-कायम, तात्पुरते व कंत्राटी कर्मचारी यांना १२ टक्के
वेतनवाढ लागू करणेत आली. राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ लागू
करण्याचा त्रिपक्षीय समितीने करार केला. राज्य शासनाच्या कामगार विभागाने शासन
निर्णय निर्गमित केला त्यानुसार एप्रिल २०१९ पासून साखर कामगारांना १२ टक्के
वेतनवाढ देण्याचा निर्णय ऑक्टोंबर २०२१ मध्ये झालेला आहे. सोबत कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चालू गाळप हंगामात
अतिरिक्त ऊस क्षेत्राचा प्रश्न कारखान्यासमोर असल्याने कारखान्याकडे नोंदलेला ३७
हजार एकर ऊस क्षेत्राचे गाळप एप्रिल अखेर करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असून
या हंगामात कारखान्याच्या सभासदांनी नोंदलेला ऊस जर त्यांना इतर कारखान्यांना
गाळपास द्यावयाचा असेल तर कारखान्याच्या शेतकी विभागास लेखी कळवून परवानगी
घेतल्यास त्यास कारखान्याची कोणतीही हरकत नसेल असा संचालक मंडळाच्या बैठकीत
निर्णय झाला. सोबत बिगर नोंदीचा ऊसही सभासद इतर कारखान्यास परस्पर गाळपास
देऊ शकतील.
मंगळवार दि.२३/११/२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये
कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचे अध्यक्षतेखाली,व्हा.चेअरमन आनंदकुमार होळकर व संचालक मंडळाच्या उपस्थितीत त्रिपक्षीय कराराची संपुर्ण
माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी संचालक मंडळापुढे मांडली
व १२ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय झाला.. सोमेश्वर कारखाना या निर्णयाची
अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२१ पासून लागू करीत आहे. तसेच कामगारांना ३१
महिन्यांचा फरक कारखान्याकडे आर्थिक उपलब्धतेनुसार दिला जाईल असे कारखान्याचे
चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. या निर्णयाचे सर्व कामगारांनी कारखाना
गेटवर फटाके वाजवून स्वागत केले.