मुंबई ! सामान्य रुग्णालय मंचर बांधकामासाठी निधी मंजूर.
शिरूर तालुका आणि परिसरात उत्कृष्ट आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील - गृहमंत्री वळसे पाटील.
मुंबई - आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील सामान्य रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि निवासस्थान बांधकामासाठी 86 कोटी 55 लक्ष 30 हजार इतक्या रकमेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली.
मंचर येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे 200 खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाने विशेष बाब म्हणून यापूर्वीच मान्यता दिली होती. या रुग्णालयासाठी आवश्यक असलेली इमारत तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान बांधण्यासाठी अर्थसंकल्पाव्दारे निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे गृहमंत्री श्री वळसे पाटील यांनी केली होती. आंबेगाव तालुक्याची आणि परिसराची रुग्णालयाची गरज लक्षात घेवून शासनाने या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचे मान्य केले
असून भविष्यकाळात मंचर याठिकाणी रुग्णांसाठी आणखी 100 खाटांची उपलब्धता होणार आहे.
यामाध्यमातून आंबेगाव शिरूर तालुका आणि परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील असे गृहमंत्री श्री वळसे पाटील यांनी सांगितले.