Type Here to Get Search Results !

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी
शेतकऱ्याने जनावरांच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली तर त्यांना होणारे आजार टाळता येतात. तरी देखील पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा योग्य पोषणाअभावी जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. गायींना घटसर्प, फऱ्या, पोटकृमी, विषबाधा, तिवा, अपचन अशा प्रकारच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. तसेच शेळी, मेंढींना फुटरॉट, आंत्रविषार, विषबाधा, हिमरेझीक सेप्टिसेमियाजंतप्रार्दुभाव, यासारखे आजार होतात. या आजारावर वेळीच उपचार केल्यास होणारे नुकसान टाळता येते.

*घटसर्प* 
या आजारामध्ये जनावरांना अधिक प्रमाणात ताप येतो. श्वास घेण्यास त्रास होवून घशा भोवती सूज येवून जनावरे मृत्युमुखी पडतात. जनावरांच्या शरीरामध्ये घटसर्पाचे जंतू असतात परंतू वातावरणात झालेला बदल व उन्हाळ्यात पौष्टिक चारा न मिळाल्यामुळे शरीरावर ताण येऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे या आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. जनावरांना आजार होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी हिमरेझीक सेप्टिसेमिया या घटसर्प प्रतिबंधक लसीची मात्रा  दिल्यास या आजारापासून जनावरांचे रक्षण होते.  

*फऱ्या*
या आजारात जनावरांना ताप येतो व एक किंवा दोन्ही पायांना सूज येऊन जनावरे लंगडतात. कमी वयाची जनावरे या रोगास जास्त बळी पडतात. त्यामुळे जनावरांचे वेळीच लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी ब्लॉक क्वार्टर (बीक्यू) ही लस घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्याने दोन वर्षाच्या आतील वासरांचे शंभर टक्के लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. 

*पोटफुगी किंवा अपचन* 
पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होतो. परंतू अचानक चाऱ्यांमध्ये बदल केल्यास तर पोटफुगी होऊन जनावरे दगावतात. चाऱ्यात बदल करतांना थोड्या थोड्या प्रमाणात पूर्वीचा व नवीन चारा एकत्र करुन खाण्यासाठी द्यावा. हिरवा चाऱ्यांबरोबरच वाळलेला चाराही देण्यात यावा. पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यात यावे त्यामुळे अपचन थांबविता येते.
*फुटरॉट*
शेळी व मेंढीमध्ये पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे खुरामध्ये जंतुची वाढ होऊन पायांना व खुरांना सूज येते तसेच तापही येतो. शेळ्या चालतांना लंगडतात. खुरांची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पोटाशिअम परमॅगनेटच्या द्रावणामध्ये खुरे बुडवून स्वच्छ धुतल्यास हा आजार आटोक्यात येते.


*आंत्रविषार*
शेळी व मेंढी मध्ये ह्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते.  जास्त प्रमाणात कोवळे गवत खाल्यास अपचन होते. यावेळी शेळ्या आजारी पडून चालतांना अडखळतात. तोल जावून श्वास घेण्यास त्रास होतो. पोट फुगी किंवा जुलाब होवून जनावरे दगावतात. पावसाळ्यापूर्वी लसीकरण केल्यास आजार नियंत्रणात येतो. जनावरांना योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. शेळी व मेंढ्यांना एंटरोटोक़्झेमिया (ईटी) लस १४ दिवसाच्या अंतराने दोनवेळेस  देण्यात यावी.

जंत प्रादुर्भाव: 
पावसाळ्यात विविध प्रकारचे जंत पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित पाणी होते. असे दूषित पाणी पिल्यामुळे  लिव्हर फ्ल्यूक, गोलकृमी, पट्टकृमी या जंताचे शरीरात प्रमाण वाढून प्राणी दगावतात. हे जंत वाढण्यासाठी गोगल गायी कारणीभूत असतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी आपल्या सर्व जनावरांना जंतनाशक औषध पाजून घेतल्यास जंताचे प्रमाण कमी होते आणि प्राण्याची उत्पादनक्षमता वाढून दगावण्याचे प्रमाण कमी होते.


पावसाळ्यामध्ये पशुधनांच्या आवश्कतेनुसार लसीकरण करणे, गोठ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन केल्यास पशुधनांची उत्पादकता वाढवून संभाव्य मरतुकीपासून बचाव होवू शकतो. जनावरांमध्ये आजार आढळल्यास पशुपालकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांक साधावा- उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. शीतलकुमार मुकणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test