पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी मोहिमस्तरावर करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. आतापर्यंत ५ लाख १४ हजार २४६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ८९६ कोटी ३५ लक्ष रुपये जमा करण्यात आले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविणे हा शासनाचा उद्देश आहे. तथापि, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बँक खाते आधार क्रमांकाला न जोडल्यास आणि लाभार्थ्यांचे ई-केवायसी न केल्यास यापुढील लाभ दिला जाणार नसल्याने सदर काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. त्यासाठी १० ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबवावी.
जिल्ह्याने योजनेबाबत केलेल्या कार्यवाहीचा देशपातळीवर सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याबाबत दक्षता घ्यावी. कृषिमित्रांनी संकलित केलेल्या माहितीला महसूल अधिकाऱ्यांनी प्रमाणित करावे. प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये मिळणार असल्याने याबाबत आवश्यक नियोजन करावे. जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ९६३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण आणि १ लाख १४ हजार ५१६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची आधार जोडणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. बँकांनीदेखील या कामासाठी आवश्यक सहकार्य करावे.
गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या महा-ई-सेवा केंद्र आणि सामान्य सेवा केंद्रांना देण्यात आल्या आहेत. कृषी सेवक, ग्रामसेवक आणि महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या गावांसाठी नियोजन करून कालमर्यादेत काम पूर्ण करावे. स्वयंनोंदणी केलेल्या १ लाख ३५ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या माहितीची त्वरीत तपासणी करण्यात यावी, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.
श्री.खराडे म्हणाले, लाभार्थ्यांच्या याद्या चावडीवर ठेवण्यात याव्या. लाभार्थ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्यात यावी. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार जोडणीचे काम वेगाने पूर्ण करावे.
ई-केवायसी वेळेत न झाल्यास पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असे श्री.बोटे यांनी सांगितले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकरी उपस्थित होते. जिल्हाधिकरी डॉ.देशमुख यांनी ई-सेवा केंद्र आणि सामान्य सेवा केंद्र चालकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन त्यांनादेखील ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांना आवाहन...
डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी-ई-केवायसी व आधार जोडणी वेळेत न झाल्यास पात्र शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याने शेतकऱ्यांनी याकामी यंत्रणांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांनी जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रात जावून नोंदणी पूर्ण करावी.