वाल्ह्यात संत सावतामाळी पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी
स्वकर्मात व्हावे रत !! मोक्ष मिळो हातो हात !!
सावत्याने केला मळा !! विठ्ठल देखियला डोळा !!
वाल्हे प्रतिनिधी-या उक्ती प्रमाणे कर्म हेच दैवत असा संदेश देणारे थोर संत सावतामाळी यांची पुण्यतिथी पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीत मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी येथील सावतामाळी मंदिरात धार्मिक परंपरेनुसार संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन प्रवचन व इतरही धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.या दरम्यान टाळ मृदुंगाच्या गजरात सावता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत वाल्हे पंचक्रोशीसह जेऊर मांडकी पिंगोरी पिसुर्टी दौंडज आदी भागातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता.
तर ह.भ.प.शिवाजी महाराज भोसले चैतन्य महाराज शिंदे तसेच आकाश महाराज कामथे यांच्या काल्याच्या कीर्तन सेवेमुळे संपूर्ण वाल्हे नगरीच जणू भक्तीसागरात चिंब झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
यावेळी किरण भुजबळ व सागर भुजबळ यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तर सावतामाळी तरुण मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ, श्रीनाथ तरुण मंडळ, महात्मा फुले विकास प्रतिष्ठान, नवयुग तरुण मंडळ, नवमहाराष्ट्र युवक संघटना,आदी सामाजिक मंडळांकडून या कार्यक्रमांची चांगल्याप्रकारे व्यवस्था करण्यात आली होती.