चेअरमन साहेब जरा इकडं पण लक्ष द्या.....सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजेची सध्याची गुणवत्ता ढासळलेलीच - बुवासाहेब हुंबरे.
गावातील मुलांनी डॉक्टर ,इंजिनिअर ,ऑफिसर,खेळाडू तर स्पर्धेच्या युगात कशी टिकायची हा प्रश्न ऐरणीवरच...
अजूनही ओबडधोबड खडकावरच विद्यार्थी सकाळची प्रार्थना करतात ही शोकांतिका.
सोमेश्वरनगर - आम्ही ग्रामपंचायत मध्ये पदावर असताना आपले लाडके नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करंजे गावात श्री सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे पाचवी ते दहावी पर्यंत हायस्कूल सुरू केले. त्याच काळात अतिशय सुंदर वास्तू उभारली गेली.
सुरुवातीला पाचशे पर्यंत असणारी विद्यार्थी संख्या आज रोजी तीनशेहून कमी आली आहे. ही विद्यार्थी संख्या कमी का झाली याचा कोणीही लेखाजोगा घेतला नाही असे सोमेश्वर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा 2022 दरम्यान माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे सोमेश्वर सभागृहात बोलत होते.पुढे बोलताना हुंबरे बोलताना म्हणाले की करंजे परिसरातील मुले पुन्हा एकदा सोमेश्वर नगरचे हायस्कूलमध्ये येऊ लागली याचाही विचार कोणी केला नाही. ही वेळ का आली कारण येथील गुणवत्ता ढासळली आहे. आम्ही बरेच दिवसापासून सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाकडे गुणवत्ता सुधारण्यासाठी पाठपुरावा करत होतो परंतु याची दखल आजतागायत घेतली गेलेली नाही. शाळेतील गुणवत्ता तपासणीसाठी आम्ही शाळेच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून गुणवत्ता तपासण्यासाठी एखादी समिती नेमून त्याचा अहवाल आपण संचालक मंडळाकडे द्यावा आणि योग्य त्या सूचना कराव्यात अशी विनंती केली होती. परंतु तो अहवाल आजपर्यंत संचालक मंडळापुढे ठेवला आहे की नाही हे कोणालाही माहित नाही? किंवा त्या अहवालाचे पुढे काय झाले हे आम्हाला सांगितलेले नाही?
करंजे गावातील भाग शाळेमध्ये कठीण विषयासाठी म्हणजेच इंग्रजी व गणित असणारे शिक्षक हे आमच्या मुलांसाठी जादाचे तास घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आमच्या मुलांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी खूप अडचण येत आहे. विद्यार्थी शिकला पाया मजबूत झाला तरच देशाचे भविष्य चांगले आहे. करंजे गावामध्ये शेतमजुरांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही. शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे अभ्यास घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मुलांना इंग्रजी गणित विषयांसाठी खाजगी क्लासेस लावू शकत नाहीत.
करंजे गावातील मुलांच्या गुणवत्तेकडे शिक्षण प्रसारक मंडळ लक्ष देणार आहेत का?
खरंतर बारामतीची ओळख शिक्षण क्षेत्रामध्ये विद्येचे माहेरघर अशी होताना दिसत असताना त्याच बारामतीच्या पश्चिम भागामध्ये शिक्षणाची होणारी ही अवस्था अतिशय लाजिरवाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी अमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करणे गरजेचे आहे. अठरा वर्षांपूर्वी आलेली ही भाग शाळा त्याबरोबर आलेल्या प्रयोग शाळेचे साहित्य आजही बंद खोक्यामध्ये आहे. ते पॅकिंग सुद्धा अजूनही उघडलेले नाही मग आमच्या मुलांनी प्रयोग शाळेसाठी जायचे कुठे, आणि या अठरा वर्षांमध्ये प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके कशी झाली असतील याचा कोणी विचार करेल का?
गेले अठरा वर्षापासून कॉम्प्युटर बंद अवस्थेत आहेत याचा गंभीरतेने कोणी विचार करेल का?
प्रार्थनेसाठी मुले ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी अजूनही ओबडधोबड खडक आहे हे 18 वर्षे त्यामध्ये काही बदल झालेले नाही याकडे कोणी लक्ष देईल का? वृक्षारोपण सोडा साधी एखादी कुंडी सुद्धा शाळेत लावली गेलेली नाही एवढी उदासीनता शिक्षकांच्या कडून अपेक्षित आहे का?
26 जानेवारी रोजी संपूर्ण गाव गोळा झाला असताना आम्ही माहिती घेत असताना आमच्या लक्षात आले की शाळेमध्ये मुलींसाठी व महिला शिक्षकांसाठी शौचालय नाही. त्यासाठी महिला शिक्षक व मुली घरी जात होते. शाळेमध्ये शौचालय नसणे हा मोठा कलंक आहे. हे त्यावेळी उपस्थित असलेले विद्यमान संचालक संग्राम सोरटे यांच्या लक्षात आले त्यांनी स्वतः उपस्थित राहून अर्जंट मध्ये शौचालयाचे दुरुस्ती करून घेतली आणि ते वापरासाठी सुरू केले. आपल्या बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे आपल्या परिसराचे नाव देशांमध्ये उज्वल करीत असताना त्यांचे महिलांसाठी आणि मुलींसाठी असणारे कार्य पाहता त्यांच्याच मतदारसंघात मुलींसाठी आणि महिलांसाठी असलेली ही दुरावस्था काळिमा फासणारी आहे. याकडे शिक्षण मंडळाचे आजपर्यंत लक्ष का गेले नाही?
याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे.
आमच्या मुलांसाठी खेळाचे मैदान नसल्यामुळे आमची मुले कुठेही स्पर्धेत सहभागी झालेली दिसत नाहीत. मग आमच्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव कधी मिळणार?
हे मी सभासदांच्या निदर्शनास आणू इच्छितो.
यामध्ये कोणतीही राजकीय भूमिका नसून आमच्या गावातील मुलांच्या शिक्षणाकडे असणारे दुर्लक्ष हे मी आपल्या निदर्शनास आणत आहे.
अशा पद्धतीने जर शिक्षण होत असेल तर आमच्या गावातील मुलांनी डॉक्टर ,इंजिनिअर कसे व्हायचे. आमची मुलं या स्पर्धेमध्ये कशी टिकायची
आमच्या मुलांनी कोणत्याही खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग न घेतल्यामुळे आमच्या मुलांना गुणवत्ता असूनही चांगला खेळाडू होता येत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे.यासाठी आम्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मी सर्व सभासदांना विनंती करतो की यासाठी आपण सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संचालक मंडळाला विनंती करतो आपण यामध्ये लक्ष घालून मुलांच्या गुणवत्तेसाठी जे गरजेचे असेल ते बदल करावेत यासाठी गावच्या वतीने आमच्याकडून जी मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहोत.मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि आमची मुलं या स्पर्धेसाठी टिकावीत हा एकमेव हेतू आहे.
आपली शिक्षण संस्था ही शंभर टक्के अनुदानित असूनही शिक्षकांचे मोठमोठे पगार पाहता मुलांच्या प्राथमिक शिक्षणाकडे शिक्षकांची आणि संस्थेची दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.
आजचे संचालक मंडळ अतिशय अभ्यासू असून या प्रकरणाची दखल गांभिर्याने घेतील अशी अपेक्षा सर्वसाधारण सभे प्रसंगी बोलताना हुंंबरे यांनी व्यक्त केली.