Type Here to Get Search Results !

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात'फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम'ची बाजी

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात'फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम'ची बाजी
पुणे, दि. २९: जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम' या माहितीपटाने बाजी मारली. परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले, जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराजराजे भोसले, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, उद्योजक रोहित राठी, महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार, संयोजन समिती सदस्य मनीषा उगले, अजित शांताराम, महेश गोरे, पवन घटकांबळे आदी उपस्थित होते.

पर्यटनातील व्यावसायिक संधी व माध्यमे या विषयावरील परिसंवादात डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी विचार मांडले. त्या म्हणाल्या, पर्यटन क्षेत्र खूप व्यापक असून यामध्ये नोकरी, व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. त्याकडे आपण डोळसपणे पाहायला हवे. पर्यटन करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. राज्यातील पर्यटन स्थळांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची ठरते. आपण पर्यटनाला जातो तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे.

डॉ. विश्राम ढोले म्हणाले, पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यात माध्यमे महत्वाची भूमिका बजावू शकतात. छोट्या चित्रफिती, माहितीपट, लघुपट, ब्लॉग्स अशा माध्यमातून प्रसार करता येतो. 

पर्यटन क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज असून, पर्यटन क्षेत्र समजून घेत रोजगाराभिमुख शिक्षण घेतले, तर हे क्षेत्र अनेकांना रोजगार देऊ शकते, असे शिरीन वस्तानी यांनी नमूद केले.

यावेळी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शुभदा जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्पतरु अॅग्रो टुरिझमचे विनोद बेले यांना उत्कृष्ट कृषी पर्यटन, गंगोत्री होम्स अँड हॉलीडेजचे गणेश जाधव व राजेंद्र आवटे यांना उत्कृष्ट वॉटरफ्रंट रिसॉर्ट, पराशर अँग्रो टूरिझम मनोज हाडोळे यांना उत्कृष्ट इनक्ल्यूजीव्ह टूरिझम, रिवांता फार्म्सचे मिलिंद चव्हाण यांना उत्कृष्ट बुटीक रिसॉर्ट इन कोकण, द मिलर रेस्तरॉचे संकेत राका यांना उत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, जेट एव्हिएशनचे शिरीन वस्तानी यांना उत्कृष्ट एम्प्लॉयमेंट सपोर्ट इन टुरिझम, नंदग्राम गोधाम कृषी पर्यटन केंद्रचे अभिलाष नागला यांना उत्कृष्ट गो पर्यटन या पुरस्काराने गौरविण्यात आले.


*महोत्सवातील विजेते*
लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग, छायाचित्रण या प्रकारात हा महोत्सव झाला. माहितीपट प्रकारात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ ला प्रथम क्रमांक, ‘उमरिया की यात्रा’‍ला द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले.  ‘गोमीरा मास्क डान्स’ तसेच ‘विठ्ठलाचं झाड’ यांना फेस्टिवल मेन्शन तर ‘श्रीक्षेत्र टू शेजाता’ आणि ‘टू व्हील्स 435 दिवस’ या लघुपटांना ज्युरी मेन्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

छायाचित्र प्रकारात वारी-फुगडी छायाचित्रासाठी योगेश पुराणिक यांना प्रथम क्रमांक, तर निसर्गचित्रासाठी थुल्लीमिल्ली प्रिन्स यांना द्वितीय क्रमांक, निसर्गरंग छायाचित्रासाठी ओंकार भोसले यांना फेस्टिवल मेन्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

लघुपट प्रकारात ट्रॅव्हलर्स डिलाईट या लघुपटाला फेस्टिवल मेन्शन पुरस्कार तसेच व्ही-लॉगसाठी ‘नेमाची वॉटरफॉल’ ला फेस्टिवल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test