सोमेश्वरनगर ! 'सायबर जागरूकता दिन' निमित्त महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना माहिती.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा.काकडे महाविद्यालयात'सायबर जागरूकता दिन' साजरा करण्यात आला. वारंवार वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व तरुणांमध्ये सायबर जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्विक हिल फाऊंडेशन व महाराष्ट्र पोलीस सायबर सेल यांच्या वतीने सायबर जागरुकतेचा कार्यक्रम महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविला जातो. त्यांच्यामार्फत क्विक हिल फौंडेशनच्या स्वयंसेविका व शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष बीबीए(सीए) या वर्गातील कु. रितू आगम व कु. शेख झोया या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात येऊन मु. सा. काकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी माहिती दिली. त्यांच्या सादरीकरणामध्ये त्यांनी हॅकिंग बद्दल माहिती दिली. तसेच, विद्यार्थ्यांबाबत एखादा सायबर गुन्हा घडला तर महाराष्ट्र पोलीस सायबर सेलकडे कशा प्रकारे तक्रार करता येईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात सायबर सुरक्षेच्या प्रतिज्ञेने झाली. यामध्ये 'आम्ही इंटरनेटचा वापर करताना सर्व नियमांचे पालन करू तसेच कोणत्याही ऑनलाईन आमिषाला आम्ही बळी पडणार नाही' अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा. रविंद्र जगताप, प्रा. रविंद्र होळकर, प्रा. रामभाऊ हाके, प्रा. प्रियांका होळकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. कुलदीप वाघमारे यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील बीबीए(सीए) चे विभागप्रमुख प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी केले व प्रा. चेतना तावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.