पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
पुणे, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२२-२३ आंबिया बहार मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्वावर) या ९ फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून ३० जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.
या योजनेत सहभागाची द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम १ लाख ६ हजार ६६७ रुपये आहे. मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम २६ हजार ६६७ रुपये, केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ४६ हजार ६६७ रुपये, पपई फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ११ हजार ६६७ रुपये असून या तिन्ही पिकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.
संत्रा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम २६ हजार ६६७ रुपये, काजू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार ३३३ रुपये असून दोन्ही पिकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे.
कोकणातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर तर इतर जिल्ह्यातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ असून दोन्हीसाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ४६ हजार ६६७ रुपये इतकी आहे.
डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ४३ हजार ३३३ रुपये, स्ट्रॉबेरी फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून विमा संरक्षित रक्कम २ लाख रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ६६ हजार ६६७ रुपये आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता जिल्हानिहाय वेगवेगळा असू शकतो.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले असून गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरिता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.