सुपे ! सुप्यात संतराज पालखीचे उत्साहात स्वागत
सुपे - श्री क्षेत्र संगमबेट- वाळकी येथुन प्रस्थान ठेवलेल्या श्री संतराजमहाराज पालखीचे सुपेकरांच्यावतीने उत्साहात स्वागत केले.
या पालखीने छप्पन मेरु घाटाचे चढण पार करुन सुप्यात प्रवेश करताच येथील सोंड परिसरात पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच मल्हारी खैरे, सदस्य शौकत कोतवाल, मिनाक्षी बारवकर, रेखा चांदगुडे, मुनीर डफेदार, अनिल हिरवे, हभप प्रमोदमहाराज जगताप, शफिक बागवान, अशोक लोणकर, अशोक बसाळे, पालखी प्रमुख सुरेश
महाराज साठे आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी सुपे गावाकडे मार्गस्थ झाली.
यावेळी टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल विठ्ठल म्हणत येथील ग्रामस्थांची भजनी दिंडी आणि शहाजी विद्यालयाची प्रसादिक दिंडी पालखीस सामोरी गेली. यावेळी पालखी आगमनाने येथील वातावरण भक्तीमय झाले होते.
येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी वरच्या पेठेतील शहाजीराजे मैदानावर विसावली. यावेळी अश्वमेघाचे मोठे गोल रिंगण झाले. येथील रिंगण सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तसेच यावेळी भजन व फुगड्या खेळण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला.
त्यानंतर हरिनामाचा गजर करीत मुख्यपेठेतुन पालखी मुक्कामी स्थळाकडे मार्गस्थ झाली. पालखी तुकाई मंदिरात विसावल्यावर सार्वजनिक महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील ग्रामस्थांच्यावतीने मिष्टान्न भोजन वारकऱ्यांना देण्यात आले. यावेळी येथील जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमोद जगताप यांचे वाटचालीचे किर्तन झाले.
दरम्यान पालखी प्रमुख सुरेश महाराज साठे म्हणाले की, संतराज महाराज पालखी सोहळ्याचे हे ५६ वे वर्षे आहे. यावर्षी भाविकांच्या देणगीतुन सुमारे सव्वा सहा लाख किमतीच्या संतराज आणि यशोमाता यांचे चांदीचे मुखवटे करण्यात आले आहेत. तर १५० राहुट्यामुळे सुमारे ३ हजार वारकऱ्यांची निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी वारकऱ्यांसाठी भिमा पाटस आणि घोडगंगा या दोन कारखान्यांकडुन टॅंकरची सोय करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष साठे यांनी दिली.
____________________
-फोटो ओळी-
सुपे येथील शहाजीराजे मैदानावर अश्व रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.