Type Here to Get Search Results !

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे...निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्वांच्या शंभर टक्के टपाली मतदानासाठी प्रयत्न करा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे...
निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्वांच्या शंभर टक्के टपाली मतदानासाठी प्रयत्न करा

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्यादृष्टीने ‘स्वीप’ उपक्रमांवर भर देण्यासह प्रत्यक्ष विविध घटकांपर्यंत जाऊन जनजागृती करावी, तसेच निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्व अधिकारी- कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी यांचे टपाली मतदान होईल याची विशेष दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

लोकसभा निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपमुख्य निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, अतिरक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, रेश्मा माळी, प्रतिभा इंगळे, स्वीपच्या नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, माध्यमविषयक नोडल अधिकारी विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर आदी उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढविणे खरे आव्हान असून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी विविध उपक्रम राबवा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, सर्व गृहनिर्माण संस्था, औद्योगिक आस्थापना आदी क्षेत्रात संबंधितांचे मतदान वाढावे यासाठी जनजागृती करावी. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी लवकरच हिंजवडी येथील कंपन्यांसोबत बैठक व जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे नियोजित असल्याचे ते म्हणाले. 

पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान असलेल्या विधानसभा मतदार संघ तसेच मतदान केंद्रात मतदानाचे प्रमाण वाढविल्यास चांगले काम होईल. विद्यार्थी मतदारांबाबत सर्व महाविद्यालयांशी समन्वयाने काम करा. सर्व कार्यालयांना निवडणूकीसाठील नेमलेल्या आपल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या टपाली मतपत्रिका त्या वेळी त्वरित साक्षांकित करुन देण्यासाठी आताच पत्र द्यावेत. महिलांच्या मतदानावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून जनजागृती करता येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान यंत्रणेतील मनुष्यबळाची नेमणूक, आवश्यक साहित्य पुरवठा, यंत्रणेचे प्रशिक्षणासाठी व्यवस्था, मतदान काळात द्यावयाच्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेच्या प्रमाणित कार्यपद्धती बनविणे, आचारसंहिता, खर्च संनियंत्रण आदींच्या अनुषंगाने त्यांनी विविध सूचना दिल्या.

महिलांचे मतदान वाढविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिनस्त सर्व महिला बचत गटांच्या महिलांमध्ये जनजागृती करण्यात येईल. या महिलांकडून परिसरातील महिलांमध्येही मतदानाबाबत आवाहन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test