बारामती ! इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जसा माउली लडिवाळा
आज रोजी शनिवार,दि.१५ रोजी अतिशय चैतन्यमय वातावरणात नवोदितांचे स्वागत पारंपारिक पद्धतीने औक्षण करून करण्यात आले. यावेळी श्र्लोक,मंत्रांच्या ध्वनिफीतीने वातावरण अतिशय आल्हाददायक झाले होते.
शाळेत उपस्थित राहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा ही जणू आतुर होवून वाट पाहत होती. संपूर्ण शाळा, शाळेचे आवार, मुख्य प्रवेशद्वार हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स, रंगीबेरंगी फुगे, रांगोळी यांनी सजवले होते. प्रवेशद्वारातून प्रवेश करताच विद्यार्थ्यांसाठी फोटो कॉर्नरचे आयोजन करण्यात आले होते. तेथे पालकांनी पाल्याचे फोटो काढण्याचा मनमुराद आनंद लुटला.
शाळेतील सर्व वर्ग देखील तोरणे लावून, लहान-मोठया आकाराच्या चित्रांनी, शैक्षणिक साहित्यांनी तसेच सुंदर असे फलक लेखन करून सजवण्यात आले होते.
पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य आकर्षण असणारे मोटू आणि पतलू (कार्टून कॅरॅक्टरस्) यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचे व समस्त पालकांचे मन जिंकून घेतले.
प्रार्थना आणि परिपाठाने शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. मा. मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर आणि प्रत्येक इयत्तेचा प्रतिनिधी यांनी दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन केले. सर्व शिक्षक व सेवक वर्ग यांनी परिपाठादरम्यान आपला परिचय करून दिला. तसेच नियमित परिपाठ, स्तोत्र पठण केले गेले. त्याचबरोबर मराठी, संस्कृत, इंग्लिश, कन्नड, पंजाबी भाषेत शाळेची ओळख करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 'आरोग्यम धनसंपदा' असे नेहमी म्हटले जाते. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी झुंबा हा व्यायाम प्रकार सचिन मांढरे सर यांनी उत्तम प्रकारे घेतला.
प्रत्येक वर्गात विविध उपक्रम व खेळ घेतले गेले. सर्व विद्यार्थ्यांना भेटकार्ड देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन मोटू आणि पतलू या कार्टून्सच्या पात्रांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला गेला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.