Type Here to Get Search Results !

रोजगार मेळाव्यात उमेदवारांची निवड व्हावी यासाठी शिकाऊ उमेदवारी योजनेवर भर द्यावा- डॉ. सुहास दिवसे

रोजगार मेळाव्यात उमेदवारांची निवड व्हावी यासाठी शिकाऊ उमेदवारी योजनेवर भर द्यावा- डॉ. सुहास दिवसे
पुणे : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त येत्या २७ जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि कंपन्यांना कौशल्यप्राप्त उमेदवार मिळतील यासाठी शिकाऊ उमेदवारी योजनेवर अधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

छत्रपती शिवाजीनगरन येथील मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. दिवसे बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी पुणे सचिन बारवकर, डॉ. अर्चना पठारे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन उदास, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांच्यासह किरण साळी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना उत्पादने पुरविणाऱ्या लघुउद्योगांना  मनुष्यबळाची मोठी कमतरता असून ही चांगली संधी असल्याचे सर्व माध्यमातून उमेदवारांपर्यंत पोहोचवावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून चांगल्याप्रकारे प्रशिक्षीत झालेले मनुष्यबळ मिळावे ही उद्योगांची अपेक्षा असते. त्यास अनुसरुन उमेदवारांवर लक्ष्य केंद्रीत करावे. क्षेत्रनिहाय मागणी आणि पुरवठा याबाबत नियोजन करावे. सर्व शासकीय व खासगी आयटीआयना मेळाव्यासाठी आपल्याकडील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठविण्याबाबत कळविण्यात यावे.

केंद्र शासनाची प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (एनएपीएस) अंतर्गत १ हजार ५०० रुपये दिले जातात. नुकतेच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ६ ते १० हजार रुपये अशी भरीव रक्कम देऊन उमेदवारांना कुशल, अर्धकुशल करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना चांगले प्रशिक्षण मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

शहर व जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज असोसिएशनसह सर्व मोठ्या आणि लहान औद्योगिक संघटना यांनी समन्वयाने सर्व आस्थापना, लघु उत्पादक, हॉटेल व्यवसायिक, पर्यटन व्यवसाय, आदरातिथ्य व्यवसाय तसेच विविध सेवा क्षेत्रातील आस्थापना यांना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे. मेळाव्याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी, असेही ते म्हणाले.

श्री. जाधव यांनी मेळाव्याच्या आयोजनाच्या अनुषंगाने माहिती दिली. या मेळाव्यात रोजगाराच्यादृष्टीने कंपन्या आणि उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे.  त्यासोबतच स्वयंरोजगाराच्यादृष्टीने सर्व विकास महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योती आदी संस्था तसेच केंद्र व राज्य शासनाच्या स्वयंरोजगार विषयक योजना राबविणारे कृषी, सहकार आदी तसेच सर्व बँका आदींना बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांचे अर्ज गुगल फॉर्मवरुन भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्याच्या ठिकाणीदेखील नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराची माहिती देण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस समर्थ युवा फौंडेशनचे निलेश भटनागर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test