एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बारामती, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
काढणी पश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीच्या वेळेस तसेच सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचीत पिकांचे नुकसान झाल्यास तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्याठी पीक विमा योजना उपयुक्त आहे.
*योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:*
ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहे. खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे.
अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकांसाठी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनादेखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळविणे आवश्यक आहे.
इतर बिगर कर्जदार शेतकरी आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरून सहभाग घेऊ शकतात. कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार या संगणक प्रणालीच्या मदतीने विमा योजनेत सहभाग नोंदविता येईल.
*जोखमीच्या बाबी:*
हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे (जलप्रिय पिके- भात, ऊस व ताग पिक वगळून), भूस्खलन, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान या बाबींना विमा संरक्षण देण्यात येईल.
*योजनेमध्ये समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व कंसात शेतकरी हिस्सा रक्कम पुढीलप्रमाणे:*
भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ५१ हजार ७६० रुपये (विमा हप्ता ४१४ रुपये), खरीप ज्वारी २७ हजार रुपये (५४० रुपये), बाजरी २४ हजार रुपये (४८० रुपये), भुईमूग ४० हजार रुपये (८०० रुपये), सोयाबीन ४९ हजार (९८० रुपये), मूग व उडीद प्रत्येकी २० हजार रुपये (४०० रुपये), तूर ३५ हजार (७०० रुपये) आणि कांदा ८० हजार रुपये (४ हजार रुपये) असे आहेत. शेतकऱ्यांनी १ रुपया भरुन पीक विमा नोंदणी करावी. उर्वरित रक्कम राज्य शासन भरणार आहे.
*ई-पीक पाहणी आवश्यक:* योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई- पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक व क्षेत्र अंतिम गृहीत धरण्यात येईल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी विमा कंपनी एच.डी.एफ.सी. इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, नजिकची विविध कार्यकारी संस्था, जवळचे सीएससी सेंटर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील संबंधीत कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.