Type Here to Get Search Results !

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज
बारामती, श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आणि श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे बारामती नगर परिषद हद्दीत आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. 

बारामती शहरात पालखीचा मुक्काम शारदा प्रांगण या ठिकाणी असून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नगर परिषद युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, वारकरी पुतळा सुशोभिकरण करणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात आली आहेत. शहरातील सर्व पथदिव सुस्थितीत सुरु राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरूस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 

पालखी मुक्कामाचे ठिकाण असलेले शारदा प्रांगण येथे मंडप, स्टेज, विद्युत, शौचालय, स्नानगृह व निवारा आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह ४५० अधिकारी व कर्मचारी असा संपूर्ण अधिकारी- कर्मचारी वर्ग वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी काम करीत आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. स्वच्छता व जनजागृतीविषयक कामासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती आणि  विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय येथील एकूण १ हजार २०० स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. 

बारामती नगर परिषद व बारामतीमधील ‘बारामती सजग नागरिक मंच’ यांनी संयुक्तपणे शौचालय व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. शहरात मार्केट यार्ड- इंदापूर रोड(२), मोतीबाग चौक, घोलप ऑटो, हॉटेल सुदित, देसाई इस्टेट, तुपे बंगला, कुलकर्णी बंगला, रेल्वे स्टेशन, पतंजली स्टोअर-भिगवण रोड, शिवकृपा सोसायटी, गोरे चाळ, श्रॉफ पेट्रोल पंप, नेवसे रोड, दाते गणेश मंदिर, सांस्कृतिक केंद्र, वणवे मळा, नाना नानी पार्क, पांढरीचा महादेव, कृषी उत्पन्न बाजार समिती  (जळोची) अशा २० विविध ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत.  

सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरीता जलशुद्धीकरण केंद्र(२), कॅनाल पुलावर पाटस रिंग रोड, अवचट इस्टेट, कचरा डेपो रस्ता, हॉटेल चैतन्य ५ ठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नगर परिषदेमार्फत शारदा प्रांगण येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ X ७ कार्यरत ठेवण्यात आला आहे. हेल्पलाईन क्र.१८००२३३२३०२ कार्यान्वित आहे.

'हरित वारी-सुरक्षित वारी' करिता नगर परिषद कार्यरत असून पालखी कालावधीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शहरातील नागरिकांनी  सहकार्य करावे, असे आवाहन श्री. रोकडे यांनी केले आहे.
0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test