मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया वेगाने राबविली जात असून आतापर्यंत १ लाख ३३ हजार ऑफलाईन आणि सुमारे ७५ हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहे. जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीदेखील यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. अंगणवाडी स्तरावरदेखील अर्ज भरून घेण्यात येत आहेत. अर्ज भरण्यासाठी आयोजित शिबिरांच्या माध्यमातून महिलांना अर्जासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलै महिन्यापासून दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ जमा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल.
प्रत्येक पात्र महिलेस योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनातर्फे योजनेची व्यापक प्रमाणात प्रसिद्धीदेखील करण्यात येत आहे. योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर नियोजन करण्यात आले असून महिलांनी सेतू सुविधा केंद्र, नारी शक्ती दूत ॲप, नगरपालिका व महापालिकेचे वॉर्ड कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन श्रीमती रंधवे यांनी केले आहे.
*मोनिका रंधवे, महिला व बालविकास अधिकारी-* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप अपडेट करण्यात आले असून त्यात एडीटचा पर्याय उपलब्ध आहे. सर्व अंगणवाडी सेविकांनी नारी शक्ती दूत ॲप अपडेट करून घ्यावे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांची माहिती चुकीची भरली असेल तर ती दुरुस्त करता येईल. परंतु ही दुरुस्ती एकदाच करण्याची सुविधा आहे. एकदा दुरुस्त करून बदल केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.
0000