महसूल पंधरवडा यशस्वी करण्याकरीता गतीमान पद्धतीने काम करा-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर
पुणे : महसूल पंधरवड्यादरम्यान राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पंधरवडा यशस्वी करण्याकरीता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गतीमान पद्धतीने काम करावे; अधिकाधिक नागरिकांनी या पंधरवड्यात उत्सर्फूतपणे सहभागी होऊन योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
प्रशासकीय भवन येथे आयोजित महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यंत्र्याचे खासगी सचिव हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, भुमीअभिलेख उपअधीक्षक संजय घोंगडे आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, महसूल विभागाकडून नागरिकांना संगणकीकृत पद्धतीने दाखले उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उपविभागीय कार्यालयाच्यावतीने एप्रिल २०२३ पासून नागरिकांना जवळपास ४९ हजार तर तहसिल कार्यालयाने जवळपास ९७ हजार दाखले उपलब्ध करुन दिले आहे. उपविभागीय कार्यालयाच्यावतीने ३८३ विविध प्रकरणांचे निकाल देण्यात आले आहे. रेल्वेच्या मार्गिकेचे भूसंपादन, संत तुकाराम पालखी मार्ग, जन्म-मूत्यूच्या नोदीं असे विविध काम महसूल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास ७५ हजार अर्ज सादर करण्यात आले आहेत, ३१ ऑगस्टपर्यंत यामध्ये आणखीन वाढ होणार आहे. तालुकास्तरीय समितीमार्फत अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
'महसूल पंधरवड्यादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, शेती, पाऊस, दाखले, युवा संवाद, महसूल-जनसंवाद, महसूल ई-प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा, महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, पंधरवडा वार्तालाप, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, विभागाच्या विविध योजनांचा लाभ, दाखल्यांचे वितरण आणि सेवा सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या विविध लोककल्याणकरी योजनेचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळवून देण्याकरीता काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
*समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची महसूल विभागाची भूमिका असावी-हनुमंत पाटील*
श्री. पाटील म्हणाले, गावपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत सर्व विभागाशी निगडित महसूल विभाग समन्वयाने काम करीत असते. प्रशासनातील सर्व विभागाशी संबंध येत असल्याने महसूल विभाग हा शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. जन्म ते मृत्यूपर्यंत सर्व प्रकारचे दाखले, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळी परिस्थिती, अवर्षण, निवडणूक यासारखी विविध महत्वाची कामे या विभागामार्फत केली जातात. त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा विश्वास आहे, म्हणून त्याच्या विश्वासास तडा न जाऊ देण्याकरीता अधिक जोमाने काम करावे. कष्ट करण्याची तयारी ठेवावी. नेहमी स्वत:ला अद्ययावत ठेवण्यासाठी वाचन करीत राहावे. कामे करतांना आरोग्यही संभाळले पाहिजे. नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून प्रशासनात आपली एक वेगळी छाप निर्माण करावी. विविध लोककल्याणकरी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरीता काम करावे, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भुमिका विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असावी, असेही श्री. पाटील म्हणाले.
डॉ. राठोड म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरीता महसूल व पोलीस प्रशासन यांचा उत्तम समन्वय ठेवणे गरजेचे आहे. याकरीता तालुक्यात पोलीस प्रशासनाच्यावतीने महसूल प्रशासनास सहकार्य नेहमीच सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. राठोड म्हणाले.
श्री. शिंदे म्हणाले, महसूल विभागाच्यावतीने महसूल विभागाच्यावतीने महसुली कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, मोजणी करणे, अपील प्रकरणाची चौकशी करणे आदी कामे केली जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व पात्र महिलांना लाभ मिळण्याकरीता प्रयत्न करावे. महसूल पंधरवड्यानिमित्त तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.
डॉ. बागल म्हणाले, महसूल पंधरवड्यातील कार्यक्रमानुसार तालुक्यात महसूल विभागाच्यामदतीने विविध लोककल्याणकारी योजना राबवून नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांपर्यत या योजनांचा लाभ पोहचविण्याकरीता पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहे, असे डॉ. बागल म्हणाले.
यावेळी पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्याचे वितरण करण्यात आले.