२८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करावा-स्वप्निल कांबळे
बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
बारामती - माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा देशभरात २००५ सालापासून लागू आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे. तरीदेखील नजीकच्या काळात अधिकारीवर्गाच्या उदासीनतेने आपल्या तालुक्यात दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून लुप्त होत चालला आहे.
बारामती तालुक्यात माहिती अधिकार अधिनियम कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात याव्यात, शासन परिपत्रकानुसार दि. २८ सप्टेंबर रोजी बारामती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा,
तसेच या दिवशी माहिती अधिकार
कायद्यातील तरतुदी व कार्यपद्धतीबाबतची माहिती विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून बारामती तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी; तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार विषयावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला कार्यक्रमांचे आयोजन करावे.
सर्व शासकीय कार्यालयांत बारामती तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व अशासकीय समाजसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या मदतीने प्रत्येक कार्यालयातील माहिती अधिकार कायदा व अधिनियम २००५ चे प्रशिक्षण, चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित करण्यात याव्यात. या सर्व मागण्यांसाठी उचित आदेश पारीत करावेत, असे निवेदन माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी गुरुवार (दि. 29 ऑगस्ट) बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना दिले आहे.