सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा भोंडला खेळ मोठ्या उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर - भारतीय सांस्कृतिक परंपरा विविधतेने नटलेली दिसते. भारतीयांनीही या संस्कृती- परंपरांचे जतन व संवर्धन केल्याने युगानुयुगे या परंपरा टिकून आहेत. महाराष्ट्र या परंपरेत अग्रस्थानी आहे. भोंडला, भुलाबाई, हादगा हा असाच महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव.महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने भोंडल्याची परंपरा पाळत असल्याचे दिसते. पश्चिम महाराष्ट्रात भोंडला तर कोकणात हादगा या नावाने ही पारंपरिक लोककला जोपासलेली दिसते.
या अनुषंगाने बारामतीतील करंजे गाव येथे ज्येष्ठ महिला वर्ग व मुलींने सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा भोंडला खेळ मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहे.
आश्विन महिन्यात हस्त नक्षत्रात प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव. अंगणात मधोमध हत्तीची प्रतिमा काढून त्याची पूजा करत, फेर धरून विविध गाणी गात ९ दिवस भोंडला खेळला जातो.
ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी,
पारव घुमतय बुरुजावारी,
बुरुजावारी फकिराचे गुंजावाणी डोळे,
गुंजवणी डोळ्याच्या सारविल्या टीका
असे म्हणत देवाला साकडे घातले जाते. स्त्रीच्या शीलाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या मुघल राज्यकर्त्यांविषयीची चीड ही महिला गाण्यातून व्यक्त करताना दिसतात. आश्विन महिन्यात सूर्याचे भ्रमण हस्त नक्षत्रात असते. या कालावधीत पाऊस पडला तर तो हस्ताने शेतकऱ्यांना दिलेला आशीर्वाद असे मानले जाते म्हणूनच मेघाचे, समृद्धीचे, जलतत्त्वाचे प्रतीक असणाऱ्या हत्तीची भोंडला खेळून सांकेतिक पूजा केली जात असते असे बोलताना ज्येष्ठ महिला वर्गांकडून माहिती बोलताना दिली.