बारामत : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या असून बारामती तालुक्यातील ढाकाळे, नारोळी, उंडवडी सुपे ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उप अभियंता शिवकुमार कुपल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक शब्बीर इनामदार, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
डॉ. बागल म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगमुक्तीबाबत केलेल्या आवाहनानुसार बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीने प्रतिसाद दिला आहे. तालुक्यात सन २०२५ पूर्वी क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याकरीता आपले योगदान अनमोल व महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावर पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने निकष पूर्ण करून गावांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करावी. तसेच नागरिकांना क्षयरोगाची लागण होणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी, प्रौढ व्यक्तींनी बीसीजी लसीकरण घ्यावे, असे आवाहन डॉ. बागल यांनी केले.