आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पांडुरंगाच्या चरणी वंदन वारकरी बांधवांना आणि राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
शेतकरी, कष्टकरी बांधवांसह महाराष्ट्र सुखी, समृद्ध, सक्षम होवो...
मराठी भाषेचा, संस्कृतीचा आवाज सगळीकडे दुमदुमु दे..
महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा दिमाखात फडकत राहू दे...
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने पुढे जाण्याची ताकद आम्हाला दे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बा विठ्ठलाच्या चरणी साकडे...
मुंबई :- "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतकं पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचं, समृद्ध करण्याचं काम केलं. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा'च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून एकतेचा, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देत आहेत. ही महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक एकजुटीची ताकद आहे. ती टिकवणं, वाढवणं ही आपली जबाबदारी आहे," असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी बांधवांना, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणतात की, "आषाढीवारीच्या रूपानं महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक चळवळ जपत, वाढवत पुढे नेत असताना मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवणे, मराठीचा आवाज आसमंतात दुमदुमत, महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे. राज्यात यंदाही चांगला पाऊस होवो. शेतकऱ्याच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची सुबत्ता येवो. राज्यातल्या घराघरात सुख, शांती, समाधान, समृद्धी नांदो," असं साकडंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगाच्या चरणी घातलं आहे.
वारीतील शिस्त, स्वच्छता, सेवाभाव, परस्पर सहकार्य, सामाजिक बंधिलकी याबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौरवोद्गार काढत, “वारीनं आपल्याला सामाजिक ऐक्य, समर्पणाची भावना आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवला आहे. हीच ऊर्जा आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे," असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना केलं आहे.