मुख्य संपादक विनोद गोलांडे
बारामती तील हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.शुक्रवार, दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९वा स्वातंत्र्य दिन शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.३० वा. प्रमुख पाहुणे लालासाहेब तांबे (निवृत्त हवालदार) यांच्या हस्ते आणि मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व ध्वजवंदन झाले. या वेळी शिक्षिकांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत यांचे सुस्वर गायन केले. यानंतर पाहुण्यांकडून पथक पाहणी आणि ध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन पार पडले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इ. १ली व २री च्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीमध्ये भारताच्या नकाशाची सुशोभनीय अशी प्रतिकृती मैदानावर तयार केली. यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांची विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी वेशभूषा करून सांस्कृतिक शोभायात्रा मनोरंजक ठरली.
भारतामध्ये राष्ट्र बांधणीमध्ये तरुणांची भूमिका यावर प्रकाश टाकणारे भाषण शाळेच्या कु. ज्ञानेश्वरी गवळी (इ. ९वी) तर भारतीय असल्याचा अभिमान का ठेवला पाहिजे हे स्पष्ट करणारे विचार कु. परिणिती गाढवे (इ. ६वी) तील विद्यार्थिनीने मांडले. यानंतर इ.५वी व ६वीच्या विद्यार्थ्यांचे सुंदर असे तिरंगी बांबू ड्रील आणि घोषपथकातील विद्यार्थ्यांनी अतिशय श्रवणीय आणि रोमांचित करणारे घोष पथकाचे वादन झाले. त्या नंतर अग्नी हाऊसच्या विद्यार्थ्यांनी 'देश हे पुकारता' या समूहगीताचे गायन केले आणि इ.३री,४थी च्या विद्यार्थ्यांनी 'जय हो' या गाण्यावर तालबद्ध नृत्य सादर केले. कार्यक्रमात पुढे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या राष्ट्रप्रेमी देशभक्तांच्या त्यागाचे आणि त्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचे पावित्र्य आपण राखले पाहिजे; तसेच आत्तापासून स्वयंशिस्त, वक्तशीरपणा आणि ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत अथक परिश्रम आत्मसात करणे गरजेचे आहे असे आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी तांबे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय सैन्य दलामध्ये काही अनुभव कथन केले.
तसेच विद्यार्थ्यांना भारताचे सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी आपल्या संस्कृतीचा ठेवा जतन केला पाहिजे, देशसेवा करताना पर्यावरणाचे रक्षण करत वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन असे सुजाण नागरिक घडविण्यासाठी आवश्यक ते सर्व संस्कार या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून दिले जात आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले..
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका प्राची चिन्मय नाईक यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर, म ए सो नियामक मंडळ सदस्यराजीव देशपांडे सर,स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य कुलकर्णी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.