पुणे - “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” संपूर्ण भारतभर तसेच पुणे जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश महिला व बालकांचे आरोग्य तपासणी करून कुटुंबाचे आरोग्य सुदृढ करणे हा आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक बालक आणि महिलांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महिलांच्या तपासणीत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग, अॅनिमिया व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात येईल. याशिवाय रक्तदान शिबिरे, आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड वितरण व निक्षे मित्र स्वयंसेवी नोंदणीही करण्यात येणार आहे.
या शिबिरांसाठी स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसिक आरोग्य तज्ञ, कर्करोग तज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात एकूण ३२४ शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व ३३२४ शिबिरे उपकेंद्रांवर, ८५ शिबिरे ही उप ज़िला रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बारामती येथील स्त्री रुग्णालयात खासदार सुनीत्रा पवार यांच्या हस्ते होणार इतर तालुक्यात खासदार आणि आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता सर्व वैधकीय आधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महिला नोडल वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, प्रसूती व स्त्रीरोग संस्था तसेच रोटरी क्लब आदींचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे व ज़िल्हा शल्य चिकित्सक, डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी माहिती दिली की, या अभियानामुळे जिल्ह्यातील महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.