सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनियर कॉलेज सी.बी.एस.सी वाघळवाडी येथील विद्यालयात दिनांक २१ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये भव्य स्वरूपात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला.
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी इयत्ता नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले. यामध्ये पूर्व-प्राथमिक विभाग जंगलसफारी तर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पंचमहाभूत या विषयांतर्गत उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी विषयाला अनुरूप हिंदी व इंग्रजी गाण्याचा सुरेख मिलाप करण्यात करण्यात आला.
दिनांक २२ नोव्हेंबर रोजी इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शक छावा या नृत्य नाट्य स्वरूपात सादर करून समस्त प्रेक्षकांची मने हेलावून टाकली.
मुलांचा उत्स्फूर्त सहभाग, उत्तम दर्जाचा अभिनय, सुयोग्य रंगमंच, वेशभूषा, ध्वनीप्रक्षेपण व्यवस्था यामुळे क्षणभरही विश्रांती न घेतात अडीच तास मुलांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना स्तब्ध केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर अजिंक्य राऊत व डॉक्टर ऋतुराज जगताप यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे यांची विशेष उपस्थिती लाभली.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक व सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली कदम मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
या सर्व कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून पालकांनी उदंड प्रतिसाद दिला.



