खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी ध्येय, चिकाटी, परिश्रम आणि संघभावना महत्वाची-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
खेळाडूनी संघभावनेने खेळ खेळले पाहिजे उंचशिखरावर जाण्याकरिता मेहनत घ्यावी - जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे
बारामती : कुठल्याही खेळात यश संपादन करण्यासोबतच उच्च पातळीवर जाण्यासाठी ध्येय निश्चित करणे, सतत सराव करणे, कठोर परिश्रम घेणे आणि संघभावना जपणे अत्यावश्यक आहे. पराभवानंतरही हार न मानता पुढील वाटचाल करण्याची वृत्तीच खेळाडूला यशाच्या उंचीवर नेते, असे प्रतिपादन बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, व जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने 20 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, छत्रपती पुरस्कार विजेती रेखा धनगड, प्रो-कबड्डी खेळाडू दादा आव्हाड, कराटे असोसिएशनचे सचिव संदीप गाडे, तसेच संदीप वाघचौरे, रवी सूर्यवंशी उपस्थित होते.
श्री. लकडे म्हणाले, खेळाडूनी संघभावनेने खेळ खेळले पाहिजे, विजेत्या खेळाडूंनी आपल्या आयुष्यात उंचशिखरावर जाण्याकरिता अधिकची मेहनत घ्यावी, ग्रामीण भागात स्पर्धा होत असल्याने येथील खेळाडूंनाही हे खेळ बघण्याची संधी मिळणार आहे, असे श्री.लकडे म्हणाले.
राज्यातील आठही विभागांतून एकूण 650 खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उद्धाटन समारंभात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते प्रथमेश कोळपे (कुस्ती) व राष्ट्रीय कराटे खेळाडू श्रुतिका कराळे, कृतिका शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र खोमणे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी केले.



