Type Here to Get Search Results !

चिमुकल्यांच्या 'आनंद बाजाराला' शेंडकरवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद!विद्यार्थ्यांनी अनुभवले उद्योजकतेचे धडे; जि.प. शाळेचा स्तुत्य उपक्रम

चिमुकल्यांच्या 'आनंद बाजाराला' शेंडकरवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद!
विद्यार्थ्यांनी अनुभवले उद्योजकतेचे धडे ; जि. प. शाळेचा स्तुत्य उपक्रम

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी करंजेपूल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दि २० रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'आनंद बाजार' आणि 'खाऊ गल्ली' उपक्रमाला पालकांचा आणि ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे, या उद्देशाने आयोजित या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल्स लावून उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांच्या शुभ हस्ते करण्यात आले. शाळेचे प्रांगण विविध स्टॉल्सनी सजले होते. यामध्ये पाणीपुरी, खमंग पॅटीस, भेळ आणि वडापाव यांसारख्या पदार्थांच्या 'खाऊ गल्ली'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातून आणलेल्या ताज्या भाज्यांचा 'शेतकरी कोपरा' ग्राहकांच्या पसंतीस उतरला. हस्तकला प्रदर्शनात मुलांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलाकृतींचेही उपस्थितांनी कौतुक केले.

व्यवहार ज्ञानाची प्रत्यक्ष शाळा
केवळ पदार्थ विक्रीच नव्हे, तर वस्तूंचे दर ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि पैशांचा हिशोब ठेवणे यातून मुलांचा आत्मविश्वास वाढल्याचे पाहायला मिळाले. "मुलांनी बनवलेले पदार्थ चविष्ट तर होतेच, पण त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खूप आनंद झाला," अशी भावना एका पालकाने व्यक्त केली.

यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी चोख नियोजन केले होते. या उपक्रमामुळे शाळेचे कौतुक सर्वत्र होत असून, अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 
मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब फडतरे यांनी केले तर आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत शेंडकर यांनी मानले. 
 यावेळी मा उपसरपंच दिलीप कुंभार, शिवाजी शेंडकर,सुभाष चोरगे, गोरख शेंडकर, जीवराज शेंडकर, रुक्मिणी शेंडकर, व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
विशेष सहकार्य शिक्षिका स्नेहल फडतरे, अंगणवाडी सेविका रेश्मा शेंडकर, मदतनीस मीनाक्षी बडेकर व महिला यांनी केले तर नियोजित कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test