बारामती - राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे बारामती तालुक्याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ कार्यक्रम जाहीर झाला असून मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या १६ जानेवारी २०२६ पासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे, नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तहसील कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेचे सुपा, गुनवडी, पणदरे, वडगाव निंबाळकर, निंबुत आणि निरावागज असे एकूण६ गट तर पंचायत समितीचे सुपा, काऱ्हाटी, शिर्सुफळ, गुणवडी, पणदरे, मुढाळे, मोरगाव, वडगाव निबांळकर, निंबुत, कांबळेश्वर, निरावागज, डोर्लेवाडी असे एकूण १२ गण आहेत. पुरुष मतदार १ लाख ३५ हजार ७३, महिला मतदार १ लाख २९ हजार ५६० आणि इतर ९ असे मिळून २ लाख ६४ हजार ६४२ इतकी आहे. मतदान केंद्र २९९ आहेत. उमेदवाकरिता खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेसाठी ९ लाख रुपये तर पंचायत समितीकरिता ६ लाख रुपये आहे. परवानग्याबाबत तहसील कार्यालय आदर्श आचारसंहिता कक्षामध्ये एक खिडकी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. एका उमेदवाराला ४ अर्ज दाखल करता येईल. निवडणुकीची मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुलामधील बॅडमिटंन हॉलमध्ये होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उमेदवारांना नामनिर्देश पत्रे दाखल प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, जाहीर सभा, प्रचार कालावधी, विविध परवानग्या, प्रतिनिधी नेमणूक तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्यादृष्टीने प्रशासन आणि राजकीय पक्षासोबत प्रतिनिधीची बैठक घेवून सूचना देण्यात आल्या आहे.
*जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-२०२६ कार्यक्रम:* नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी : १६ ते २१ जानेवारी २०२६, नामनिर्देशनाची छाननी २२ जानेवारी २०२६, उमेदवारी माघाराची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६, निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी २०२६, अंतिम उमेदवारांची यादी २७ जानेवारी २०२६, मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ आणि मतमोजणीचा दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ असा आहे, अशी माहिती श्री. नावडकर यांनी दिली आहे.



