मु. सा. काकडे महाविद्यालयास आदर्श महाविद्यालयाचा दर्जा: महाविद्यालयास गुजरात शिष्टमंडळाची भेट
सोमेश्वरनगर: मागील पाच वर्षात महाविद्यालयाने केलेल्या शैक्षणिक व सामाजिक भरीव कार्यामुळे महाविद्यालयास नॅक, बंगलोर येथील स्वायत्त संस्थेकडून ' अ ' दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2024- 25 चा उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणाच्या अंमलबजावणी नुसार पारंपारिक शिक्षणाबरोबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कौशल्य पूरक कोर्सेस व संशोधन केंद्रांची सुरुवात केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून गुजरात सरकारने गुजरात मधील महाविद्यालयांना भेट देण्यासाठी मु. सा. काकडे महाविद्यालयाची आदर्श महाविद्यालय म्हणून शिष्टमंडळ भेटीस निवड केली आहे. गुजरात सरकारच्या "लर्निंग अँड एक्सपोजर कम स्टडी टूर फॉर फॅकल्टीज " या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गव्हर्मेंट आर्ट्स कॉलेज, भानवड, जिल्हा देवभूमी द्वारका या गुजरातमधील महाविद्यालय सदस्य समितीने गुरुवार दि. 12 डिसेंबर 2026 रोजी महाविद्यालयास अभ्यास दौरा म्हणून भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून महाविद्यालय स्थापनेचा उद्देश व महाविद्यालय परिसराची पार्श्वभूमी याबद्दलची माहिती समिती सदस्यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून दिली. यावेळी समिती सदस्यांमध्ये गव्हर्मेंट आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेशकुमार राठोड, आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. नवघण दिवराणीया व इतर समिती सदस्य उपस्थित होते. सदर अभ्यास दौऱ्यादरम्यान समिती सदस्यांनी महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, मूल्यमापन, संशोधन, विस्तारित उपक्रम, भौतिक सुविधा, महाविद्यालयाचे प्रशासकीय व शैक्षणिक नेतृत्व, महाविद्यालयाच्या उत्कृष्ट प्रॅक्टिसेस व महाविद्यालयाचे वेगळेपण या नॅक च्या सात निकषांमधील सर्व घटकांचा अभ्यास करून सर्व कागदपत्रांचे व्यवस्थापन व प्रक्रिया समजून घेतली. महाविद्यालयातील सर्व विषय विभाग, संशोधन विभाग, विस्तारित विभाग, ग्रंथालय, शारीरिक शिक्षण विभाग, प्रांगण व महाविद्यालयातील इकोफ्रेंडली प्रॅक्टिसेसला भेट देऊन दैनंदिन कामकाजाची पद्धती, त्याची रचना व अंमलबजावणी प्रक्रिया या बाबी समजून घेतल्या. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्याशी संवाद साधून संबंधित विभागातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पद्धती समजून घेतली व महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाज, महाविद्यालय विकास, मूल्यमापन, संशोधन ,महाविद्यालयला प्राप्त झालेले पुरस्कार व एकूणच विद्यार्थी विकास या सर्व गोष्टींचे कौतुक त्यांनी स्वागत समारंभातील त्यांच्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी ही महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज, प्राध्यापकांची कामावरील निष्ठा व महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री.सतिशभैय्या काकडे देशमुख यांची बहुमोल साथ व मार्गदर्शन इ. गोष्टींचा उल्लेख त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून केला. यावेळी महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर अभ्यास दौऱ्याचे नियोजन, प्रस्ताविक व आभार इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय जाधव यांनी केले.



