Type Here to Get Search Results !

“भारतीय लोकशाही” विषयावर महाविद्यालयीन युवकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

“भारतीय लोकशाही” विषयावर महाविद्यालयीन युवकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांसाठी “भारतीय लोकशाही” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरूवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांच्या माध्यमातून चालवलेले शासन. भारतीय लोकशाही ही केवळ राजकीय व्यवस्था नसून ती सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांवर आधारलेली व्यापक व्यवस्था आहे. भारताच्या संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय दिला असून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य लोकशाहीने केले आहे.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ‘लोकशाही आणि राजकीय दृष्टीकोन’ या विषयावर डॉ. नारायण राजूरवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की भारतीय लोकशाही आणि भारतीय राज्यघटना या दोन्ही घटकांचा भारतीय नागरिकांच्या राजकीय दृष्टीकोनावर प्रभाव पडला आहे. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता, कायद्याचे राज्य आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचा राजकीय दृष्टीकोन ठरविण्यात महत्त्वाचा वाटा आहे. १९९० नंतर भारतीय राजकारणात नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार झाला असून जागतिकीकरण, उदारीकरण आणि निर्गुंतवणूक या तत्त्वांचा प्रभाव वाढला आहे. उदारमतवादी राजकीय दृष्टिकोनाचा भारतीय राजकारणावर प्रभाव निर्माण झाला असून नवीन पिढीला उदारीकरण, व्यक्तिस्वातंत्र्य आणि राष्ट्रीय विचारांना प्राधान्य देणारी विचारसरणी अधिक आकर्षित करत आहे.

दुसऱ्या सत्रात डॉ. निलेश अढाव यांनी ‘भारतीय लोकशाही आणि समाज व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय लोकशाहीची पायाभरणी १९५० मध्ये संविधान लागू झाल्यानंतर झाली. संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये विविधतेत एकता दिसून येते. शिक्षणामुळे समाजात जागरूकता वाढली आणि लोकशाही अधिक बळकट झाली. तथापि भारतीय लोकशाही आणि समाज व्यवस्थेसमोर काही आव्हानेही आहेत. गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीयवाद, धार्मिक तणाव आणि सामाजिक विषमता यांसारख्या समस्या आजही समाजात दिसून येतात. लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून मतदान करणे, कायद्याचे पालन करणे, सामाजिक सौहार्द राखणे आणि राष्ट्रहितासाठी काम करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील सर्व घटकांनी समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार केला तर लोकशाही अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.

ही कार्यशाळा प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. अजय दरेकर, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. प्रविण ताटे-देशमुख, प्रा. मेघा जगताप, डॉ. संजू जाधव, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. राहुल खरात, प्रा. रजनीकांत गायकवाड, डॉ. दतात्रय डुबल, डॉ. आदिनाथ लोंढे, प्रा. रविकिरण मोरे, प्रा. नामदेव जाधव, प्रा. अनिकेत भोसले, प्रा. कुंभार, प्रा. आकाश वाघमारे, अमोल काकडे, विनायक आगम, निखिल जगताप, सुजीत वाडेकर, विकास बनसोडे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी झाली. तसेच महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सतीश लकडे कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या विविध शाखांतील सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कु. विद्यांगी गायकवाड व कृष्णा काळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतना तावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दत्तात्रय जगताप यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test