सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यातील सुपा शनिवार दि १३ रोजी रात्री सुमारे ९.०० वा. पीडीसीसी बँक परिसरात शितल विकास टेमगिरे ( ता. दौंड) यांचे गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हरवले होते. याबाबत त्यांनी सुपा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून मदतीची विनंती केली.
सदर घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल किसनराव ताडगे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.
सखोल तपास आणि शोधकार्यादरम्यान सदर मंगळसूत्र एका महिलेस मिळून आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित महिलेकडून मंगळसूत्र ताब्यात घेऊन ते मूळ मालक शितल विकास टेमगिरे यांना सुपूर्द करण्यात आले.
हरवलेले सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, किंमत अंदाजे रु. १,५०,०००/- इतकी असून, अल्पावधीत शोधून दिल्याने शितल विकास टेमगिरे यांनी सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड तसेच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल किसनराव ताडगे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
______________
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही मौल्यवान वस्तू हरवल्यास / सापडल्यास अथवा कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.



