सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज वाघळवाडी येथे विद्यार्थी प्रतिनिधींचा कार्यभार स्वीकारण्याचा कार्यक्रम अत्यंत शिस्तपूर्ण पद्धतीने पार पडला. एप्रिल महिन्यात या विद्यार्थी कार्यकारिणी मंडळाची निवड संविधानिक पद्धतीने करण्यात आली. त्यामुळे मुलांना भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचा घटक असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा संक्षिप्त स्वरूपाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या प्रक्रियेत अर्ज भरणे, समर्थक गोळा करणे, प्रतिनिधी निवडणूक चिन्ह प्रचार व भाषणे अशा विविध घटनाक्रमांचा विद्यार्थ्यांनी भाग बनले. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये इ. ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी गोपनीय मतदान प्रक्रियेने आपला विद्यार्थी प्रतिनिधी निवडला.
शनिवार दि. २० जून रोजी या सर्व कार्यकारिणी मंडळ व मुख्य विद्यार्थी प्रतिनिधींना शपथ देऊन त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत शाळेच्या वर्षभराची कार्यकारिणीची जबाबदारी सोपविण्यात आली.
मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव निगडे व मुख्य विद्यार्थिनी प्रतिनिधी राजलक्ष्मी जगताप शाळेचे उपविद्यार्थी प्रतिनिधी आर्णव जगदाळे व त्रिशा मगर यांनी शपथ घेत शाळेच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहून जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन विद्यार्थी, शिक्षकांना दिले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच विद्यार्थी कार्यकारिणी मंडळातील सदस्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शविली. ही सर्व प्रक्रिया समाजशास्त्र विभागाचे प्रमुख सचिन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कर्णवर यांनी केले. शाळेच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



