१२ बेडच्या परवान्यावर २४ बेडचा वापर; नियमभंगाची नोंद असूनही प्रशासनाचे मौन.
———————————————————————
इंदापूर प्रतिनीधी : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील आशा नर्सिंग होम या हाॅस्पिटलमधील कथित बेकायदेशीर कामकाज आणि गंभीर अनियमिततां याबाबत तालुका आरोग्य अधिकारी,इंदापूर यांनी दोन वेळा जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे यांच्याकडे योग्य त्या कारवाईसाठी अहवाल व पत्र पाठवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारदार सुधाकर तुकाराम बोराटे यांनी केला आहे.
तक्रारदारांनी १८ फेब्रुवारी २०२६ मध्ये आशा नर्सिंग होमविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तालुका आरोग्य विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तपासणी अहवाल तयार केला. या अहवालात नर्सिंग होमला केवळ १२ बेडची परवानगी आहे. प्रत्यक्षात मात्र २४ बेड आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. वाढीव बेडसाठी आवश्यक शुल्क भरले नसल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेमधील त्रुटी, आवश्यक नर्सिंग स्टाफची कमतरता तसेच रुग्ण मृत्यू संदर्भातील माहितीची मागणी यांसारख्या गंभीर बाबी समोर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिनांक २९ मे २०२६ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे यांना स्वतंत्र पत्र पाठवून अहवालातील दोषांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती.मात्र दोन अधिकृत पत्रे प्राप्त होऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.या प्रकरणी आशा नर्सिंग होमची नोंदणी रद्द करावी, स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी,अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.दरम्यान, या प्रकरणात जिल्हा आरोग्य विभाग काय भूमिका घेतो आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालावर पुढे कोणती कारवाई होते, याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
———————————————————————
दोन पत्रे पाठवूनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कारवाई शून्य.
आशा नर्सिंग होम, वालचंदनगर येथील गंभीर अनियमिततांबाबत तालुका आरोग्य अधिकारी, इंदापूर यांनी दिनांक ०८ एप्रिल २०२६ रोजी तपासणी अहवाल सादर केला. त्यानंतर दिनांक २९ मे २०२६ रोजी स्वतंत्र पत्राद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे यांना दोषी मुद्द्यांवर कारवाईचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली.मात्र दोन अधिकृत पत्रे प्राप्त होऊनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
———————————————————————
१२ बेडचा परवाना; प्रत्यक्षात २४ बेड आढळले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालात आशा नर्सिंग होमला केवळ १२ बेडची परवानगी असल्याचे नमूद आहे. मात्र प्रत्यक्ष तपासणीवेळी २४ बेड आढळून आल्याची नोंद करण्यात आली आहे. वाढीव बेडसाठी शासनाकडे आवश्यक शुल्कही भरले नसल्याचे अहवालात नमूद असून यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे.
———————————————————————
नियमबाह्य नोंदणी, अपुरा स्टाफ आणि मृत्यूंची चौकशी.
अहवालानुसार नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. आवश्यक नर्सिंग स्टाफची कमतरता असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच २४ एप्रिल २०१७ ते ०८ एप्रिल २०२६ या कालावधीत उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती मागविण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
———————————————————————
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दोषांची नोंद करून कारवाईसाठी प्रस्ताव पाठवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून हलगर्जीपणा केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
———————————————————————



