बारामती ! पालक शाळेतून सुजाण पालकत्वाचा संदेश; डॉ. अमित कोकरे यांचे मार्गदर्शन
बारामती प्रतिनिधी - बारामतीतील म.ए. सो. चे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील पालकांसाठी ‘पालक शाळे’चे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बारामती येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित कोकरे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, सरस्वती वंदन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांशी संवाद साधताना डॉ. कोकरे यांनी मुलांच्या विकासातील विविध टप्प्यांचे सविस्तर विवेचन केले. प्रत्येक वयोगटात पालकांचे वर्तन कसे असावे, मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. बालपण व किशोरावस्थेत संस्कारांचे महत्त्व अधिक असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबातील संवाद वृद्धिंगत करण्यासाठी संध्याकाळचे जेवण संपूर्ण कुटुंबाने एकत्र घेण्याचा सल्ला दिला. अशा संवादातून पालक व पाल्य यांच्यात सुसंवाद निर्माण होऊन नातेसंबंध अधिक दृढ होतात, असे त्यांनी नमूद केले.
सोळा वर्षांनंतर पाल्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करणे आवश्यक असून नात्यांमध्ये मोकळेपणा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न शिजवताना मनात असलेले प्रेम होय. तसेच स्वयंपाक करण्यापूर्वी केलेली प्रार्थना अन्नाला सात्त्विकता व पोषणमूल्यांची जोड देते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी सर्व अन्नघटकांचा समावेश असलेला चौरस आहार आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.आजच्या काळात जंक फूड पूर्णपणे टाळणे कठीण असले तरी त्याचे सेवन नियंत्रित ठेवणे शक्य आहे. कॅलेंडरवर नोंद करून जंक फूड खाण्यामध्ये आठवडा किंवा पंधरा दिवसांचे अंतर ठेवण्याची सवय पालकांनी मुलांना लावावी, असे त्यांनी सुचविले. मुलांच्या संगोपनात त्यांच्या चुका वेळेवर ओळखून योग्य उपाययोजना करणे आवश्यक असून पाल्यावरील आंधळे प्रेम त्यांच्या विकासासाठी घातक ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले. मुलांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखून त्यावर उपचार व समुपदेशन केल्यास सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात, असे त्यांनी नमूद केले.‘मोबाईल ॲक्डिक्शन’ हा आजच्या काळातील गंभीर विषय असल्याचे सांगत डॉ. कोकरे यांनी पालकांना विशेष आवाहन केले. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी प्रथम पालकांनी स्वतः आदर्श निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि विशेषतः झोपेवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्क्रीनमधून मिळणाऱ्या तीव्र उत्तेजनामुळे मेंदू सहज शांत होत नाही आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात. तसेच वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुले शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय बनत असून लठ्ठपणा व त्यासंबंधित विविध आजारांचा सामना त्यांना लहान वयातच करावा लागत आहे. यासाठी शाळेतील खेळांव्यतिरिक्त मुलांना दररोज किमान एक तास मैदानावर खेळण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर शाळेच्या प्राचार्या सौ. सोनाली क्षीरसागर यांनी पालक शाळेच्या निमित्ताने पालकांशी हितगुज साधले. आगामी शैक्षणिक वर्षात शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रम आणि त्यामागील शाळेची भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी भारतीय कुटुंब व्यवस्थेत संस्कारांच्या माध्यमातून निर्माण झालेली जीवनशैली अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. ठराविक वेळी जेवण, ठराविक वेळी झोप आणि दिनचर्येतील शिस्त या मूल्यांकडे आधुनिक पिढी दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांचे तसेच कुटुंबांचे आरोग्य संतुलन बिघडताना दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन पालकांनी स्वतःचा आणि आपल्या पाल्याचा स्क्रीन टाईम निश्चित करून तो काटेकोरपणे पाळावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महिला पालकांना आपल्या स्वयंपाकघरातून मैदा, साखर आणि मीठ यांचा वापर शक्य तितका कमी करण्यासाठी प्रेरित केले. “तुमचे पाल्य तुम्हाला कसे आवडेल... Fit की unfit? Choice is Yours!” या विचारप्रवर्तक प्रश्नाचे उत्तरच सुजाण पालकत्वाकडे नेणारा मार्ग ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या पुढील सत्रात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विषय शिक्षकांची व वर्गशिक्षकांची पालकांना ओळख करून देण्यात आली. तसेच आगामी शैक्षणिक वर्षातील विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, अंतर्गत परीक्षांचे नियोजन तसेच बाह्य परीक्षा आणि विदेशी (जर्मन) भाषेचे प्रशिक्षण अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पीपीटी सादरीकरणाद्वारे पालकांपर्यंत पोहोचविण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ. प्राची नाईक यांनी केले.
सुजाण, सुसंस्कृत आणि निरोगी पिढी घडविण्यासाठी पालक, शिक्षक आणि शाळा यांच्यातील समन्वय अत्यावश्यक असल्याचा संदेश देणारा हा पालक शाळेचा उपक्रम पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरला.
सदर पालक शाळेसाठी शाला समितीचे अध्यक्ष मा.श्री.अजय पुरोहित सर, शाळेचे महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर आणि शाळेचे तसेच मएसो नियामक मंडळाचे सदस्य मा.श्री. राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



