Type Here to Get Search Results !

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
करंजे (प्रतिनिधी): स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. २० ते २२ जुलै २०२६ या तीन दिवसांत राबविण्यात आलेल्या शालेय साहित्य संकलन उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून संकलित झालेले शालेय साहित्य दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सोमेश्वर विद्यालय (भाग शाळा), करंजे येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास हीच स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास सुरुवात झाली.

प्रमुख पाहुण्या पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम-ढोले यांनी आपल्या मनोगतात श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेने गेली अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने राबविलेल्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. "गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेला हा हात म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली नवी दिशा असून, हीच स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना खरी आदरांजली आहे," असे त्या म्हणाल्या.

निर्भया पथकातील पोलीस दीदी सौ. शुभांगी दणाणे यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व, मोबाईलचा संयमित वापर, अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना बळी न पडणे तसेच कोणताही त्रास झाल्यास पालक व पोलिसांची तात्काळ मदत घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

करंजेपूल दूरक्षेत्र पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक राहुल साबळे पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना सायबर गुन्हे, ऑनलाइन गेम्सचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि डिजिटल जगातील फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री किसनराव तांबे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असून समाजातील गरजू घटकांसाठी संस्था सातत्याने करत असलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी सर्व उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत शालेय साहित्य संकलनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ, कार्यकर्ते व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. "आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रवास खंडित होणार नाही, त्याच्या स्वप्नांना नवी उमेद मिळेल. शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची ताकद आहे. त्यामुळे समाजाने अशा विधायक कार्यात कायम सहभागी व्हावे," असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक लक्ष्मण गोफने, ऋषिकेश गायकवाड, उद्योजक संतोष कोंढाळकर, प्रकाश मोकाशी, प्रताप गायकवाड, शिवाजी शेंडकर सुचित्रा साळवे, सचिन पाटोळे, विष्णुपंत दगडे, संताजी गायकवाड, मोहन भांडवलकर, प्रकाश हुंबरे, खुर्शिदा मुलानी यांच्यासह अनेक मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. खैरे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन श्री पाटोळे (व्ही. एल. सर) यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. गंगावणे (एम.ए.) यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन उपमुख्याध्यापक जगदाळे सर यांनी केले.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती जपत समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. समाजाच्या सहकार्याने उभा राहिलेला हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा देणारा ठरला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test