बारामती का: बारामती शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १० जुलै २०२६ पासून शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, पाणीपुरवठा सभापती मनीषा समीर चव्हाण यानी दिली.
बारामती शहराचा पाणीपुरवठा हा नीरा डाव्या कालव्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर आधारित आहे. मात्र, कालव्याचे आवर्तन बंद असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. या काळात शहरातील नागरिकांनी पाण्याचा संयमाने व जबाबदारीने वापर करून पाणी बचतीस सहकार्य केल्याबद्दल नगरपरिषदेकडून नागरिकांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
सध्या धरण क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी सुरू असून धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ६ जुलै २०२६ रोजी नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. त्यानंतर कालव्याचे पाणी बारामती शहरात पोहोचल्याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, १५ जुलै २०२६ रोजी बारामती शहरात जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार असल्याने शहरातील नागरिक तसेच लाखो भाविकांना अखंड व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १० जुलै २०२६ पासून बारामती शहरात नियमित दैनंदिन पाणीपुरवठा सुरू होणार असून, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि बारामती नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



