सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे 'विठ्ठल हरी नामाचा गजर.
आनंद दिंडीचा' उपक्रम उत्साहात संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'विठ्ठल हरी नामाचा गजर... आनंद दिंडीचा' या सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अभिरुप गोल रिंगण सोहळा विशेष ठरला. संपूर्ण विद्यालय परिसर विठ्ठलनामाच्या गजराने, अभंगांच्या सुरांनी आणि वारकरी संस्कृतीच्या भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संतांच्या विविध अभंगाचे गायन पार पडले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा स्पर्धा पार पडली. यानंतर विठू माऊली, रखुमाई माझी, अलंकापुरी अशा गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर केली.
यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात आनंद दिंडी काढली. दिंडीत हरिनामाचा अखंड गजर करण्यात आला. याप्रसंगी संत सोपानकाका यांच्या रिंगण सोहळ्याप्रमाणे गोल रिंगण सोहळा पार पडला. यामध्ये वारकरी वेशभूषेत असलेले विद्यार्थी यांच्यासोबत शिक्षक, शिक्षिका यांनीही रिंगणातून धावण्याचा आनंद घेतला. अशा पद्धतीने संतांच्या विचारांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विभागांनी मनापासून सहकार्य केले. विद्यार्थ्यांनीही अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख, संतांचे विचार आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व अनुभवण्याची संधी मिळाली.
मुख्याध्यापक पी. बी. जगताप व पर्यवेक्षक जी.आर. इंगळे सर कार्यालयीन लेखनिक एस .एम.वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता जगताप यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र झूरंगे सर शेवटी उपस्थितांचे आभार विश्वास पवार यांनी मानले.



