धर्म वेगळे, माणुसकी एकच! पुष्पवृष्टी ची उधळण करत संत सोपानकाका महाराज पालखीसाठी मुस्लिम समाज सरसावला.
सोहळा प्रमुख त्रिबुवन गोसावी महाराज याचा सत्कार करताना मुस्लिम बांधव
वडगांव निंबाळकर(बारामती) - अनेकांनी प्रेमाने हस्तांदोलन करुन बंधुभावाचे दर्शन घडविले. काही क्षणांसाठी धर्म, जात, पंथ, भाषा यांचे सर्व भेद विरघळून गेले.आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभाव यांचा अखंड प्रवाह आहे संत सोपानकाका महाराज सोहळा बारामतीतील निंबूत, सोमेश्वर साखर कारखाना मुक्काम आटपून सोरटेवाडी, होळ , वडगाव निंबाळकर या मार्गावरून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना वडगाव निंबाळकर येथे मुस्लिम समाजाने उत्साहाने स्वागत करा पुष्पवृष्टी ची उधळण केली.
आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी वारी नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे. या परंपरेला साजेसा हृदयस्पर्शी अनुभव बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरात पाहायला मिळाला. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत सोपान काका महाराज पालखी सोहळा दिंडीचे आगमन झाले. तिथेच वडगाव निंबाळकर मुस्लिम समाज यांच्यावतीने अत्यंत उत्साहात सेवाभावाने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. दिंडीचे आगमन होताच मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी केली आलेल्या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व अल्पोहार नियोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सोहळा प्रमुख त्रिबुवन गोसावी महाराज यांचा सत्कार मुस्लिम बांधवांनी केला.
धर्म जरी वेगळे असले तरी भक्तीची भावना मात्र एक होती, याचेच दर्शन इथं झाले.
टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”,विठ्ठल नामाच्या घोषात दिंडीचे आगमन झाले. हातात पाण्याच्या बाटल्या आणि अल्पोपहार घेऊन उभे असलेले मुस्लिम युवक प्रत्येक वारकऱ्याला प्रेमाने स्वागत करत होते. “माऊली... पाणी घ्या... अल्पोपहार घ्या...” असा आग्रह केला जात होता. या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जात होती. हा सेवाभाव पाहून अनेक वारकरी भारावून गेले होते. दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांनीही मुस्लिम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याला मनापासून प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे यातून दर्शन होत होते.
अनेकांनी प्रेमाने हस्तांदोलन करुन बंधुभावाचे दर्शन घडविले. काही क्षणांसाठी धर्म, जात, पंथ, भाषा यांचे सर्व भेद विरघळून गेले. “अवघे एकचि झालो आपण” संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा दरम्यान हा संतविचार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.



